विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून जवळजवळ महिना होत आला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपा आणि मित्रपक्ष शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन बिनसल्याने बुहमतानंतरही युतीचे सरकार राज्यामध्ये स्थापन झाले नाही. त्यानंतर आता मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हलचाली सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सरकार स्थापण्याबाबत सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली नाही अशी माहिती दिली. पवारांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेतील संभ्रम आणखीन वाढला. मात्र पवारांनी केलेला हा दावा पटलेला नसल्याचे मत ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या वाचकांनी व्यक्त केलं आहे.

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अद्यापही स्पष्ट भूमिका घेतलेली नसतानाच, सत्तास्थापनेबाबत भाजपला विचारा आणि सोनियांशी सत्तास्थापण्याच्या मुद्यावर चर्चाच झालेली नाही, अशी बुचकळ्यात टाकणारी विधाने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केली. यामुळे शिवसेनेची कोंडी झाली. राज्यात सरकार स्थापण्याबाबत शरद पवार यांनी सोमवारी सायंकाळी १०, जनपथवर जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली. सुमारे पाऊण तास उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अ‍ॅन्टोनी हे उपस्थित होते. राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती आपण सोनिया गांधी यांना दिली. राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबत या भेटीत कोणतीही चर्चा झाली नाही. सोनियांशी दोन्ही काँग्रेसबाबत चर्चा झाली. त्यात शिवसेनेशी आघाडी करून सरकार स्थापण्याचा विषयच निघाला नाही, असे पवार यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सरकार स्थापण्यासाठी किमान समान कार्यक्रम ठरला असल्याचे सोमवारी दुपारी जाहीर केले होते. पण, असा कोणताही कार्यक्रम ठरलेला नाही, असे सांगत पवारांनी किमान समान कार्यक्रमाची चर्चाच पूर्णत: नाकारली. पवारांच्या या भूमिकेने संभ्रम आणखी वाढला. याच पार्श्वभूमीवर पवारांनी सोनियांबरोबर महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेची चर्चा झाली नाही हा दावा पटतो का हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने केला. फेसबुक आणि ट्विटवर घेण्यात आलेल्या जनमत चाचणीमध्ये ८३ टक्के वाचाकांनी पवारांचा हा दावा पटलेला नाही असं मत व्यक्त केलं आहे. तर ट्विटवरील ८४ टक्के वाचकांनी नाही असं मत नोंदवलं आहे.

‘लोकसत्ता ऑनलाइन’ने फेसबुक आणि ट्विटवर ‘शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल सोनिया गांधींशी चर्चा झालीच नाही, हा शरद पवारांचा दावा पटतो का?’, हा प्रश्न वाचकांना विचारला होता. फेसबुकवर या प्रश्नाला ७ हजार १०० हून अधिक वाचकांनी मत व्यक्त केले. यापैकी ८३ टक्के म्हणजेच ५ हजार ८०० जणांनी ‘नाही’ असे मत नोंदवत पवारांचा हा दावा पटलेला नसल्याचे सांगितले. तर दुसरीकडे एक हजार १०० जणांनी ‘होय’ असे उत्तर देत पवारांचा दावा योग्य वाटत असल्याचे म्हटले.

ट्विटरवरही या प्रश्नाला १ हजार ९९३ जणांनी प्रतिसाद नोंदवला. त्यापैकी ८४ टक्के जणांनी पवारांचा दावा पटण्यासारखा नाही असं म्हटलं आहे तर १६ टक्के वाचकांनी पवारांचा दावा योग्य वाटतो असं मत व्यक्त केलं आहे.

दरम्यान, पवारांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना, ‘येत्या एक-दोन दिवसांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होऊन पुढील निर्णय घेतला जाईल’ असं म्हटलं होतं.