विधानसभा निकालानंतर तीन आठवडे झाले तरी सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. मंगळवारी राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सर्व राजकीय पक्ष यासाठी एकमेकांना दोष देताना दिसत आहेत. त्यातच वेगवेगळ्या पक्षांच्या समर्थकांनीही विरोधीपक्षांना राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्यासाठी दोषी धरल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने वाचकांना काय वाटते यासंदर्भात जनमत घेतले. त्यामध्ये ७३ टक्के वाचकांनी राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्यासाठी भाजपाच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर १८ दिवसांनंतरही सत्तास्थापनेचा तिढा कायम राहिल्याने अखेर मंगळवारी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. एखाद्या राज्यामध्ये राजकीय पक्षांच्या युतीला बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची ही देशातील पहिलीच वेळ. त्यामुळेच या राष्ट्रपती राजवटीसाठी कोणता पक्ष दोषी आहे अशी चर्चा सोशल मिडियावर रंगू लागली. भाजपाने आडमुठी भूमिका घेतल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली अशी टीका भाजपाविरोधक करत आहेत. तर शिवसेना जनमताचा अनादर करुन ज्यांच्याविरोधात निवडणूक लढली त्यांच्याविरोधात जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या विरोधकांनी केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमुळे राज्यावर राष्ट्रपती राजवट आल्याचेही पवारविरोधकांचे म्हणणे आहे. तर शिवसेना समर्थकांच्यामते काँग्रेसने वेळेत पाठिंबा पत्र न दिल्याने शिवसेनेला बहुमताचा आकडा दाखवता आला नाही आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली. याच मतमतांतरामध्ये खरा दोष कोणाचा हे ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. फेसबुक आणि ट्विटवर ‘महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीला जबाबदार कोण?’ असा प्रश्न वाचकांना विचारण्यात आला होता. फेसबुकवर या जनमत चाचणीमध्ये २१ हजारहून अधिक जणांनी आपले मत नोंदवले.
फेसबुकवर नोंदवण्यात आलेल्या २१ हजार १०० हून अधिक मतांपैकी ७३ टक्के जणांनी ‘महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीला भाजपा जबाबदार’ असल्याचे मत नोंदवले आहे. म्हणजेच १५ हजार जणांनी भाजपाच राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तर २७ टक्के वाचकांनी म्हणजेच ५ हजार ६०० जणांनी राष्ट्रपती राजवट लागू होण्यासाठी शिवसेनेची भूमिका जबाबदार असल्याचे म्हटलं आहे. या फेसबुक पोलवर ३०० हून अधिक जणांनी कमेंट करुन आपले मत नोंदवले आहे. काही जणांनी भाजपावर याचे खापर फोडले आहे तर काही जणांनी शिवसेनेने हट्ट केल्यामुळे बहुमत असूनही युतीचे सरकार सत्तेत आले नाही असं म्हटलं आहे. अनेक वाचकांनी ‘मतदार म्हणून आपण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला,’ असे मत व्यक्त केलं आहे.
राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाचा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी समर्थन केले आहे. बुधवारी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शाह यांनी ‘राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता. नियोजित वेळेत कोणत्याच पक्षाला सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. आता या राष्ट्रपती राजवटीचे राजकारण करुन सहानुभूती मिळवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे,’ असा आरोप केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 14, 2019 12:20 pm