राज्यात सत्तास्थापनेचं नाट्य पाहता, पुन्हा निवडणुका घेण्यात यावी या मनसेची मागणीला मतदारराजाने पाठिंबा दर्शवला आहे. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने फेसबुक तसेच ट्विटवर घेतलेल्या सर्वेक्षणामध्ये १७ हजार जणांनी आपले मत नोंदवले. फेसबुकवरील १४ हजार ६०० पैकी ७२ टक्के लोकांनी पुन्हा निवडणुक घेण्याची मनसेची मागणी योग्य असल्याचे मत नोंदवलं आहे. म्हणजेच १४ हजारपैकी १० हजारहून अधिक जणांनी पुन्हा निवडणुक व्हायला हवी असं म्हटलं आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाला शनिवारी अगदीच अनेपेक्षित कलाटणी मिळाली. शुक्रवार रात्रीपर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत येईल असं वाटत असतानाच अचानक शनिवारी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र त्यानंतर शरद पवारांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा अजित पवारांचा निर्णय वैयक्तिक असून राष्ट्रवादी पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तापेचावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी “राज्यातल्या चारही प्रमुख पक्षांची नैतिक पातळी घसरली आहे, त्यामुळे एक राजकीय कार्यकर्ता आणि मतदार म्हणून पुन्हा एकदा जनादेश घ्यायला हवा,” असं मत व्यक्त केलं होतं. याच पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने जनतेचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. “राज्यात सत्तास्थापनेचं नाट्य पाहता, पुन्हा निवडणुका घेण्याची मनसेची मागणी योग्य वाटते का?,” असा प्रश्न ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या फेसबुक पेजवरुन तसेच ट्विटर अकाऊंटवरुन विचारण्यात आला.

फेसबुकवर या प्रश्नावर एकूण १४ हजार ६०० हून अधिक जणांनी आपले मत नोंदवले त्यापैकी ७२ टक्के वाचकांनी होय राज्यामध्ये पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी योग्य वाटते असं मत व्यक्त केलं. तर २८ टक्के वाचकांनी (४ हजारहून अधिक) नाही असे उत्तर दिले.

ट्विटवर विचारण्यात आलेल्या या प्रश्नावर अडीच हजारहून अधिक जणांनी आपले मत नोंदवले. त्यापैकी ६७ टक्के लोकांनी मनसेची मागणी योग्य असल्याचे मत नोंदवलं तर ३३ टक्के लोकांनी पुन्हा निवडणुक नको असं मत व्यक्त केलं.

२४ ऑक्टोबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. दिलेल्या वेळेत कोणत्याही पक्षाने सरकार स्थापन करण्यात असमर्थता दर्शवल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची तयारी दाखवली होती. शुक्रवारी रात्रीपर्यंत राज्यात या तिन्ही पक्षांचे सरकार सत्तेत येईल असं चित्र दिसत होतं. मात्र शनिवारी सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री आणि उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या घटनेनंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाल्याचे पहायला मिळाले.