विधानसभा निकालाच्या २० दिवसांनंतरही राज्यातील राजकीय तिढा न सुटल्याने अखेर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे राज्याचा सर्व कारभार राज्यपाल पाहणार आहेत. राज्यातील सर्व घडामोडींवर आता थेट केंद्र सरकारचे नियंत्रण असेल. या निर्णयामुळे राज्यामध्ये विधीमंडळाचे कामकाज होणार नाही. मंत्रीमंडळही बरखास्त झाले असून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून मागील काही दिवसांपासून कार्यरत असणारे देवेंद्र फडणवीसही आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीमधून मुक्त झाले आहेत. मात्र बहुमत मिळाल्यानंतर एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळेच या राष्ट्रपती राजटीसाठी कोण दोषी आहे अशी चर्चा सध्या रंगत आहेत. याच पार्शवभूमीवर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने वाचकांना काय वाटते यासंदर्भात जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केला. मात्र राज्यापालांच्या विनंतीवरुन आपणच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार असल्याचे फडणवीस यांनीच राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर शनिवारी राज्यपालांना राज्यातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले. मात्र शिवसेनासोबत नसल्याने आम्ही सत्ता स्थापन करणार नाही असं भाजपाने रविवारी स्पष्ट केलं. त्यानंतर सत्ता स्थापनेचे आमंत्रण मिळालेल्या शिवसेनेला सोमवार संध्याकाळी साडेसातपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पाठिंबा पत्रे न मिळाल्याने सत्ता स्थापनेसाठीचा बहुमताचा आकडा राज्यपालांसमोर मांडता आला नाही. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी २४ तासांचा कालावधी देण्यात आला. मात्र हा कालावधी पूर्ण होण्याआधीच राज्यातमध्ये मंगळवारी दुपारी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे आता राज्यातील सर्व निर्णय केंद्र सरकार राज्यपालांच्या माध्यमातून घेईल. राज्यामध्ये अशाप्रकारे राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने पक्षाचे समर्थक एकमेकांना दोष देताना दिसत आहे. भाजपाने आडमुठी भूमिका घेतल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली अशी टीका भाजपाविरोध करत आहेत. तर शिवसेना जनमताचा अनादर करुन ज्यांच्याविरोधात निवडणुक लढली त्यांच्याविरोधात जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या विरोधकांनी केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमुळे राज्यावर राष्ट्रपती राजवट आल्याचेही पवारविरोधकांचे म्हणणे आहे. तर शिवसेना समर्थकांच्यामते काँग्रेसने वेळेत पाठिंबा पत्र न दिल्याने शिवसेनेला बहुमताचा आकडा दाखवता आला नाही आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली. याच मतमतांतरामध्ये खरा दोष कोणाचा हे ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

फेसबुक आणि ट्विटवर ‘महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीला जबाबदार कोण?’ असा प्रश्न वाचकांना विचारण्यात आला आहे.

फेसबुकवर मत नोंदवण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करु शकता

ट्विटरवर मत नोंदवण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करुन शकता

ही जनमत चाचणी केवळ २४ तासाच्या कालावधीसाठी घेण्यात येणार आहे.