केवळ ४२.४७ टक्के मतदान झाल्याची नोंद

जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत सर्वात कमी मतदान पालघर मतदारसंघात झालेले असून किनारपट्टी भागाबरोबरीने केळवे रोड परिसरातील अनेक मतदान केंद्रांवर मतदार नागरिकांचे बहिष्काराचे सावट दिसून आल्यामुळे या विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यातील इतर मतदारसंघात झालेल्या मतदानाची टक्केवारी सर्वात कमी आहे. शासकीय संकेतस्थळावर ती संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ४२.४७ टक्के इतकी होती. या मतदारसंघात एकूण २,७३,९९४ इतके मतदार आहेत.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ  नये यासाठी पालघर विधानसभा मतदारसंघात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विधानसभा मतदारसंघाची निवडणूक शांततेत पार पडली असली तरी या निवडणुकीवर काही ठिकाणी मतदारांनी बहिष्कार टाकल्याचा फटका या मतदानाच्या टक्केवारीला बसला. या विधानसभेत मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

विधानसभा मतदारसंघातील इतर ठिकाणी भरघोस मतदान झाले असले तरी इतर निवडणुकांच्या वेळी राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची व निर्णायक मते असलेल्या गावांनी मतदानवर बहिष्कार टाकल्यामुळे मतदारांच्या तुलनेने मतदान कमी झाले आहे. पालघर विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षांनी हवा तितका प्रचार न केल्यामुळे तसेच प्रशासनामार्फत वाटल्या जाणाऱ्या मतपत्रिका मतदारांपर्यंत न पोहोचल्यामुळे काही मतदार जनजागृतीपासून वंचित राहिले.

पालघर विधानसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली असली तरी अपेक्षेप्रमाणे मतदार मतदानासाठी उतरलेले दिसले नाहीत. संध्याकाळी चार वाजेपर्यंत पालघर विधानसभा मतदारसंघातील मतदान केल्याची टक्केवारी ही जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांच्या टक्केवारीपेक्षा कमीच होती. संध्याकाळी चार वाजेपर्यंत पालघर विधानसभा मतदारसंघात ४४.०५ टक्के मतदान झालेले आहे. यावरून या मतदारसंघातील मतदार यांनी या निवडणुकीपासून नाराजी व्यक्त केल्याचे दिसत आहे.

सकाळी सात ते नऊ  या दोन तासांच्या सत्रात विधानसभेत हवे तसे मतदान झालेले नव्हते. दुपारी १ वाजेपर्यंत या विधानसभेत २०.९३ टक्के, २ वाजेपर्यंत ३३.९२ टक्के, ४ वाजेपर्यंत ४४.०५ टक्के तर ६ वाजेपर्यंत ४२.४७ टक्के मतदान झाले. याउलट वसई, नालासोपारा, विक्रमगड आदी ठिकाणी सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले.