19 October 2019

News Flash

वर्धा जिल्ह्य़ातील निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीवर धडकले

शिंदेंची उमेदवारी निश्चित करण्यासाठी समीर देशमुख यांना महामंडळाचे आश्वासन दिले जाऊ शकते,

शिवसेना

समीर देशमुखांच्या प्रवेशाने अस्वस्थता

प्रशांत देशमुख, वर्धा

महाभरतीच्या वादळात विदर्भातील सेनेचे एकमेव उपनेते अशोक शिंदे यांनाच तडाखा बसल्याने जिल्हा शिवसेनेत वादळ उठले असून न्याय्य मागण्यांसाठी निष्ठावंत मातोश्रीवर धडकले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते समीर देशमुख यांच्या सेना प्रवेशाने निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ते सेनेतर्फे  देवळी मतदारसंघातून लढणार असल्याची खात्री दिल्या जाते. युती करताना जिल्हय़ातील चारही जागा भाजपच लढणार असून सेनेला एकही जागा न देण्याचा सूर होता. परंतु पक्षाच्या संघटन रचनेत महत्त्वाचे पद असलेले उपनेता या पदावरील अशोक शिंदे यांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाल्यावर एक जागा देण्याची तडजोड प्रस्तावित होती. सेनेचा गड समजल्या जाणाऱ्या हिंगणघाट मतदारसंघातून शिंदे तीनवेळा आमदार राहलेले गतवेळी युती नसताना पराभूत झाले. आता भाजपचे आमदार समीर कुणावार यांची तिकीट कापून सेनेलाच तिकीट मिळण्याची त्यांना खात्री होती.

पण समीर देशमुख यांच्या प्रवेशाने व देवळीवर हक्क सांगितल्याने त्यांचा हिंगणघाट मतदरासंघ गोत्यात आले आहे. हा प्रवेश पक्षातील कुणाच्याच पचनी पडलेला नसल्याचे विविध प्रतिक्रियातून दिसून येते. दोन्ही पक्षाच्या विद्यमान आमदारांची तिकीट कापल्या जाणार नसल्याचे सूत्र पुढे येण्याच्या पाश्र्वभूमीवर अशोक शिंदे यांना देवळीतून लढवण्याचा तोडगा काढण्यात आला. मात्र देशमुख देवळी समीकरण शिवसैनिकांच्या आशेवर पाणी फे रणारे ठरले आहे. सेनेच्या दहा सदस्यीय उमेदवार निवड मंडळातील एक सदस्य असणाऱ्या शिंदेंना हमखास तिकीट मिळणार असल्याचा दावा शिंदे समर्थक अजूनही करीत आहे. शिंदेंची उमेदवारी निश्चित करण्यासाठी समीर देशमुख यांना महामंडळाचे आश्वासन दिले जाऊ शकते, अशी शक्यता एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली. मात्र, अन्याय झाल्याची भावना असणारे शिवसैनिक शिंदेंसह मुंबईकडे रवाना झाले. याविषयी मुंबईतून प्रतिक्रिया देताना अशोक शिंदे म्हणाले की, अद्याप काहीही निश्चित झाले नाही. विद्यमान आमदारांना पुर्नसधी देण्याचे सूत्र असले तरी काही बाबतीत अपवाद केल्या जाण्याची शक्यता आहे. आपल्याला लढण्याच्या तयारीला लागण्याची सूचना सहा महिन्यापूर्वीच मिळाली होती. कुणाचा पक्षप्रवेश हा वादाचा विषय होऊ शकत नाही.

First Published on September 17, 2019 1:00 am

Web Title: loyal shiv sainiks in wardha district reached on matoshree zws 70