नगर : विधानसभा निवडणुकीचे मतदान सुरु असताना अनेक ठिकाणची मतदान यंत्रे प्रक्रिया सुरु असतानाच, मध्येच बंद पडण्याचा अनुभव मतदारांना आला. मात्र याचे प्रमाण गेल्या मार्चमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानापेक्षा कमीच आहे. आजच्या मतदानाच्या वेळी जिल्ह्य़ात १३८ मतदान केंद्रावरील यंत्रे मतदानाची प्रक्रिया सुरु असताना बंद पडले. ही आकडेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतची आहे. त्यात वाढ होऊ शकते. अर्थात निवडणूक यंत्रणेने ती तातडीने बदलली. परंतु मतदारांचा खोळंबा झाला. काही ठिकाणी मतदार परतले व यंत्र सुरु झाल्यावर पुन्हा आले.

जिल्ह्य़ात ३ हजार ७२२ मतदान केंद्रे होती. काल, रविवारी सायंकाळपर्यंत तेथे मतदान साहित्य घेऊन कर्मचारी पोचले. आज, सोमवारी प्रत्यक्ष मतदान सुरु होण्यापूर्वी या यंत्रांची उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक (मॉकपोल) घेतले जाते. निवडणूक यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘मॉकपोल’ वेळी १६ बॅलेट युनिट, २४ कंट्रोल युनिट व ६४ व्हीव्हीपॅट, अशी एकूण १०४ यंत्रे बंद पडल्याचे आढळले. मतदान यंत्रे बंद पडल्यास ती तातडीने बदलली जावीत यासाठी निवडणूक यंत्रणेने पथके तैनात केलेली होती. नगर तालुक्यातील इसळक येथील मतदान यंत्र मतदान सुरु झाल्यानंतर काही वेळाने बंद पडले, ते सुमारे दोन तास बंद होते. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत १३ बॅलेट युनिट, १३ कंट्रोल युनिट व ११२ व्हीव्हीपॅट बंद पडले. तेही बदलण्यात आले. शिर्डी व राहुरी मतदारसंघात सर्वाधिक यंत्रे बंद पडली, त्यांची संख्या प्रत्येकी १८ आहे. सर्वात कमी बंद पडलेल्या यंत्रांची संख्या नगर शहर व कोपरगाव मतदारसंघातील आहे, तेथे प्रत्येकी पाच यंत्रे बंद पडली. लोकसभा निवडणुकीतील मतदाना दरम्यान सुमारे ४०० हून अधिक यंत्रे बंद पडली होती. त्या वेळी प्रचंड उन्हाळा होता. वाढत्या तापमानाचा फटका यंत्रांना बसल्याचे कारण त्या वेळी निवडणूक यंत्रणेने दिले होते. परंतु आज वातावरण तुलनेने थंड असतानाही यंत्रे बंद पडलीच.