गेल्या तीन तासांपासून सुरू असलेली महाविकास आघाडीची बैठक संपली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक सुरू होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे, अहमद पटेल, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह तिन्ही पक्षातील सर्वच नेते या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित होते. बैठकीतील चर्चेनंतर सर्वच नेत्यांनी वरवरची माहिती देत खातेवाटपाची माहिती देण्याचे टाळले.

मंगळवारी (२७ नोव्हेंबर) दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपाचं सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यपालांनी महाविकास आघाडीला सरकार स्थापनेसाठी आंमत्रण दिलं होतं. महविकास आघाडी सरकार स्थापन करत असून, उद्या (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजता उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पण, महाविकास आघाडीच्या बैठका अद्याप सुरूच आहे. खातेवाटपासह अनेक विषयांवर आघाडीच्या नेत्यांची सायंकाळी बैठक बोलावण्यात आली होती.

या बैठकीत खातेवाटपासह सगळ्याच मुद्यावर चर्चा होणार होती. मात्र, बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांनी बैठकीतील चर्चेविषयीची माहिती देण्यास टाळलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, “बैठकीत चर्चा झाली आहे. मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला नाही. रात्री ते ठरणार आहे. उद्या शपथविधी सोहळा होणार असून, तेव्हाच सगळ्या गोष्टी माहिती होतील,” असं थोरात यांनी सांगितलं.

विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबत काँग्रेस आग्रही असल्याचं वृत्त आहे. उपमुख्यमंत्रीपदा नको विधानसभा अध्यक्षपद हवं, अशी भूमिका काँग्रेस बैठकील घेतल्याचं समजते. दुसरीकडं सर्व मुद्दे निकाली निघाले आहेत. आमचं सगळं ठरलं आहे. काही छोट्या गोष्टी आहेत. त्या सरकार स्थापन झाल्यावर निकाली निघतील, अशी माहिती काँग्रेसचे मल्लिकार्जून खर्गे यांनी दिली.