राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना युती होणार की नाही याबद्दल संभ्रमाचे वातावरण आहे. “शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाही तर युती तुटू शकते,” अस सूचक वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले होते. त्यावर “युती होणार आहे. युतीबद्दल बोलण्याचे अधिकार तीन व्यक्तीनांच आहे. त्यांच्याशिवाय कुणालाही अधिकार नाही,” असे सांगत भाजपाचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रावते यांना टोला लगावला आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असताना युतीचं जागावाटपावरून सुरू असेललं चर्चेच गुऱ्हाळ सुरूच आहे. दोन्ही पक्षात बाहेरून मोठ्या प्रमाणात नेते आल्याने शिवसेना-भाजप स्वतंत्र लढण्याची तयारी करीत असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. दरम्यान, “शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाही तर युती तुटू शकते,” असे शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.

भाजपाचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जागावाटपावरून युती तुटू शकते हा दावा फेटाळला आहे. महाजन म्हणाले, “युतीच्या जागावाटपाचा प्रश्न वरिष्ठ पातळीवरील आहे. त्याबद्दल बोलण्याचा अधिकार फक्त तीन लोकांनाच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीन व्यक्तीनांच युतीबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. युती होणार आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांत जागावाटपाचा तिढा सुटेल,” असे महाजन यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

शिवसेनेनं ‘आरे’पेक्षा मुंबईतील समस्यांकडे लक्ष द्यायला हवं

मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोड करण्याला शिवसेनेने विरोध केला आहे. राजकीय दबाव टाकण्यासाठी हा विरोध केला जात आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर महाजन म्हणाले, “राजकीय दबाव काहीही नाही. आरेतील वृक्षतोडीला विरोध ही शिवसेनेची भूमिका आहे. ते ती घेऊ शकतात. पण, आरेपेक्षाही मुंबईत रस्ते, वाहतूक, पाणी यासारखे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. त्यावर शिवसेनेने लक्ष द्यायला हवं,” असा उपरोधिक सल्ला महाजन यांनी शिवसेनेला दिला.