bपाच वर्षांत राज्यावरील कर्ज दुप्पट झाले, कुठ गेला हा पैसा? भ्रष्ठाचार झाला नाही म्हणताना खडसे, मेहता, सावरा, कांबळे यांना का काढले? पाच वर्ष राज्याला फक्त लुबाडण्याचे काम यांनी केले, अशी खरमरीत टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

कलम ३७० ने तालुका किंवा जिल्ह्य़ाचे प्रश्न सुटणार नाही, ही निवडणूक देशाची नाही, राज्य विधानसभेची आहे. याचे भान ठेवा असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या उपस्थित आज येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी भानुदास तिकांडे होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

अजित पवार यांनी भाषणात भाजपाला लक्ष केले होते. शिवसेनेबद्दल ते चकार शब्द बोलले नाही. पिचड  पिता-पुत्रांवर नाव न घेता संयमित भाषेत टिका करताना जिल्हा बँक अध्यक्षांचा संदर्भ येताच त्यांची जीभ घसरली. काही जणांचे लक्ष निळवंडे, भंडारदऱ्याच्या पाण्याकडे आहे असा टोला त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता लगावला. संपूर्ण कर्जमाफीसह  सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देताना त्यांनी स्वामिनाथ आयोग लागू करण्याबद्दल काहीच भाष्य केले नाही. तर शेती मालाला योग्य पध्दतीचा दर देऊ असे सांगितले.

काही राजे गेले, नेते गेले, काही सेनापती गेले, तरीही या वयात पवार साहेब फिरत आहेत. त्यांना स्वत:ला काही नको, राज्य चांगल्या लोकांच्या हातात राहिले पाहिजे, हीच त्यांची भूमिका असल्याचे अजित पवार म्हणाले. सत्तेवर असताना केलेल्या चुकांवर पांघरुण घालण्याकरिता काहींनी पक्षांतर केले असल्याची टीका त्यांनी पिचड पिता-पुत्रांचे नाव न घेता त्यांनी केली. पक्षाने यांना काय कमी केले? विरोधी पक्ष नेते पद दिले, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री बनविले, जिल्हा परिषदेत सभापती पद दिले, जिल्हा बँकेचे अध्यक्षपद तालुक्याला दिले, सर्व काही भरभरुन दिले. यांनी मात्र पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याला सोडण्याचे पाप केले. निवडणुकीत तुम्हाला भावनिक आवाहन केले जाईल. मत मागताना डोळयात पाणी आणतील, माझी ही शेवटची निवडणूक असल्याचे सांगत मते मागितली जातील, मात्र या नाटकाला भुलू नका, असेही ते म्हणाले.

निवडणूक एकास एक करण्याचे तुम्ही ठरविले आहे. त्यासाठी आणाभाका घेतल्या त्याला गालबोट लागू देऊ नका. तुमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसते, मात्र या कशालाही बळी पडू नका असे ते म्हणाले. एकाही कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्यास अजित पवार त्याच्या पाठीशी आहे, ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी लक्षात असू द्या असेही त्यांनी सुनावले.

अगस्तीने शेतकऱ्यांना फक्त २ हजार ४०० रुपये भाव दिला. चार महिने झाले कामगारांना पगार नाही, याचा संदर्भ देत संस्था चालवायच्या असतात, लुबाडायच्या नसतात. स्वत:चे घरे भरायची नसतात, असा टोला त्यांनी लगावला.

राज्य शासनाच्या विविध धोरणांवर चौफेर टिकास्त्र सोडले. हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले आहे. कृतिशून्य आहे. पाच वर्षांत यांनी चांगले काम केले असते तर यात्रेत यांच्यावर कुणी शाई फेकली नसती, कडकनाथ कोंबडय़ा फेकल्या नसत्या, त्यांना काळे झेंडे दाखविले नसते. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेच्या काळात पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले, नजरकैदेत ठेवले. यावर टीका करताना ही लोकशाही आहे का? हुकूमशाही असा सवाल त्यांनी केला.

पाच वर्षांत राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता कुणावर ३०२ चा गुन्हा दाखल करणार? शिक्षणाचा खेळखंडोबा झाला, बेरोजगारी वाढली, महागाई वाढत आहे, आर्थिक मंदी आली, राज्यातील गुंतवणूक ठप्प झाली. या प्रश्नांवर मुख्यमंत्री मात्र काहीच बोलत नाही अशी टीका त्यांनी केली.

कारखान्यात ७५ टक्के नोकऱ्या स्थानिकांना देण्याचा कायदा केला जाईल, शेतीमालाला, दुधाला योग्य पध्दतीचा दर देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार अकोले तालुक्यात एमआयडीसी सुरु करु तसेच येथे कारखाने व्हावेत म्हणून त्यांना सवलती देऊ असे त्यांनी सांगितले.

अकोले तालुक्यातील पाट पाण्याचे अनेक प्रश्न मार्गी लावले. निळवंडे पूर्ण केले, उच्चस्तरीय कालव्यांना मंजुरी दिली. नियमात बसत नसतानाही पिंपळगाव खांडला विशेष बाब म्हणून मान्यता दिली. अंबित, बलठण, पाडोशी असे अनेक प्रकल्प मार्गी लावले. पुनर्वसनाचे प्रश्न सोडविले. जनतेला पाणी मिळावे ही एकच भावना यामागे होती. जीवाचे रान केले आहे, आता पावती देण्याची वेळ आली आहे. २४ तारखेला बारामतीत नाही तर अकोल्यात गुलाल अंगावर घेण्यासाठी येतो आहे, असे ते म्हणाले.

आयुष्यभर जातीय वादाविरुध्द टीका करणाऱ्या पिचडांनी म्हातारपणी भगवा हातात घेतला. भाजपामध्ये प्रवेश करताना जनतेला विचारले नाही, त्यामुळे ही निवडणूक आता राष्ट्रवादी विरुध्द भाजप अशी राहिली नाही, तर जनतेचा अपमान व गद्दारीचा वचपा काढणारी निवडणूक बनली आहे अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी केली.

ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, डॉ. किरण लहामटे, सुनिता भांगरे, अमित भांगरे, विनोद हांडे, विनय सावंत आदींची पिचडांवर प्रखर टीका करणारी भाषणे झाली. संदिप शेणकर यांनी सूत्रसंचालन केले.