नागपूर : विधानसभा निवडणुकीत विदर्भातील एकूण ६२ जागांसाठी सोमवारी सरासरी ५८.३७ टक्के मतदान झाले. गोंदिया व भंडारा  जिल्ह्य़ात सर्वाधिक ६० टक्के तर सर्वात कमी मतदान गडचिरोली व नागपूरमध्ये अनुक्रमे ५२ व ५३ टक्के झाले.

कृषिमंत्री आणि भाजपचे उमेदवार डॉ. अनिल बोंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी पुरस्कृत स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी पहाटे मालखेड गावानजीक घडली. हल्लेखोरांनी त्यांना मारहाण केली तसेच त्यांची कारही पेटवून दिली. त्याआधी हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

विदर्भात विधानसभेच्या एकूण ६२ जागा असून त्यासाठी ७३९ उमेदवार रिंगणात आहेत. यात प्रामुख्याने नागपूरच्या द.पश्चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बल्लारशा (चंद्रपूर) येथून अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार, विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार (ब्रह्मपुरी) रिंगणात आहेत. पाचपर्यंत  बुलढाणा ५८.८७ टक्के, वाशीम ५७ टक्के, अमरावती ५६ टक्के, अकोला ५३.५७ टक्के, चंद्रपूर ५५.८४ टक्के, नागपूर ५३.९८, वर्धा ५६.८६ टक्के, यवतमाळ ५८.८२ टक्के, गोंदिया ६४.०६ टक्के, भंडारा ६४ टक्के तर गडचिरोलीमध्ये ५२.५१ टक्के मतदान झाले.

नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी १० वा. व्हीआयपी रोड, धरमपेठमधील महापालिकेच्या डीकी दवाखाना केंद्रावर मतदान केले तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महालमधील केंद्रावर मतदान केले. नागपूर जिल्ह्य़ात  विकासकामे झाल्यावरही मतदानाची टक्केवारी घसरली. मुख्यमंत्री रिंगणात असलेल्या द. पश्चिम मतदारसंघात ४४ टक्के मतदान झाले.विदर्भातील ६२ पैकी जास्तीत जास्त जागाजिंकण्याचे भाजपेच उद्दिष्ट होते. मतदान कमी झाल्याने भाजपच्या गोटात  चिंतेचे वातावरण होते. गत वेळी भाजपचे ४४ तर काँग्रेसचे १० आमदार निवडून आले होते.

नोटाविरोधात संघाची मोहीम

शहरी मतदारांनी ‘नोटा’चा वापर केल्यास भाजपला फटका बसू शकतो ही बाब लक्षात घेऊन संघाने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान ‘नोटा’ विरुद्ध मोहीम राबवली होती. मतदानाच्या दिवशीही त्यांनी   ‘नोटा’ न वापरण्याचे आवाहन मतदारांना केले. शहरी भागात विद्यमान सरकारच्या विरोधात नाराजी असल्याने ते ‘नोटा’च्या विरोधात नाराजी व्यक्त करण्याची भीती संघाला होती. काही संघटनांनीही यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता होती. ही बाब ओळखूनच संघाने नोटा विरोधात अभियान राबवले होते. सोमवारी सकाळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत  व सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मतदान केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मतदानाचे महत्त्व विशद केले. मतदान हा लोकशाहीने दिलेला अधिकार असून त्याचा प्रत्येकाना वापर केलाच पाहिजे तो त्याचा अधिकार आहे, असे मोहन भागवत म्हणाले तर ‘नोटा’ वापर अयोग्य आहे, असे  जोशी म्हणाले