अधिसूचना जारी होणार, उमेदवार अर्ज दाखल करण्यास सुरुवात

मुंबई : सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आणि काँग्रेस-राष्ट्रवादीकरिता अस्तित्वाची लढाई असणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे. निवडणुकीसाठी अधिसूचना उद्या जारी होऊन उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात होईल.

२७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ७ ऑक्टोबपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त सुट्टी असली तरी या दिवशीही उमेदवारी अर्ज दाखल करून घ्यावेत, अशी मागणी राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्या सुरुवात होत असली तरी पितृ पंधरवडा संपल्यावर किंवा घटस्थापनेपासूनच म्हणजे २९ तारखेपासून राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल होण्याची चिन्हे आहेत. भाजप-शिवसेना युती किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपांची अद्याप अधिकृतपणे घोषणा झालेली नाही.

राज्य विधानसभेसाठी ८ कोटी ९५ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदानाकरिता राज्यात ९५,४७३ मतदान केंद्रे असतील. राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी २९ मतदारसंघ हे अनुसूचित जाती तर २५ मतदारसंघ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.

भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. २०१४ मध्ये सत्ता मिळाल्यापासून राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा आलेख उंचीवरच गेला. महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेना युतीला एकतर्फी यश मिळाले. या पाश्र्वभूमीवर पुन्हा सत्ता मिळण्याबाबत युतीचे नेते आशावादी आहेत. लोकसभा निवडणुकीत २८८ पैकी २२८ विधानसभा मतदारसंघांमध्ये युतीच्या उमेदवारांना आघाडी मिळाली होती. या आधारेच २२० पेक्षा जास्त जागा जिंकू, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, काँग्रेस व राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई आहे.