विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. न्यूज १८ एक्झिट पोलचा निष्कर्ष मनसे आणि वंचित बहुजन आघाडीसाठी धक्कादायक आहे. न्यूज १८ च्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना महायुतीला दणदणीत यश मिळणार आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागेल.

एक्झिट पोलच्या आकडयानुसार काँग्रेसला १७ तर राष्ट्रवादीला अवघ्या २२ जागांवर समाधान मानावे लागेल. आघाडीच्या मिळून ४१ जागा निवडून येतील. त्याचवेळी सत्ताधारी भाजपा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपाला सर्वाधिक १४४ आणि शिवसेना ९९ जागा मिळतील असा अंदाज आहे. महायुतीला मिळून २४३ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

भाजपाचे नेते २२० जागा मिळतील असे सांगत होते. एक्झिट पोलने त्यापेक्षा जास्त जागा मिळण्याच अंदाज वर्तवला आहे. एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले तर शिवसेनेच्या इतिहासातील आतापर्यंत सर्वाधिक जागा त्यांना मिळतील. एक्झिट पोलचे आकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी धक्कादायक आहेत. राज ठाकरेंनी जोरदार प्रचार केला होता. त्यांच्या सभानाही प्रचंड गर्दी झाली होती. शिवसेना आणि भाजपामधल्या मतभेदांचा मनसेला काही जागांवर फायदा होईल अशी चर्चा होती. पण मनसे आणि वंचितला एकही जागा मिळणार नाही असे एक्झिट पोलचा निष्कर्ष आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला १२२, शिवसेनेला ६३, काँग्रेसला ४२, राष्ट्रवादीला ४१ आणि मनसेला एक जागा मिळाली होती. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा निम्म्याने कमी होतील.