18 October 2019

News Flash

धोतर, टोपी अन् दोन उमेदवार.

हरिभाऊ बागडे यांना विधानसभा अध्यक्षपद आणि आधी युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद भूषविण्याची संधी मिळाली

औरंगाबाद : पांढरेशुभ्र धोतर आणि त्याखाली मोजे आणि बूट घालणारे दोन नेते महाराष्ट्राच्या विधानसभेत ठसठशीतपणे दिसायचे. एक हरिभाऊ बागडे आणि दुसरे मधुकरराव चव्हाण. बोलताना आणि वागणुकीत कधीही तिरकी चाल फारशी दिसणार नाही; पण राजकारणातले सगळे चढउतार आणि बेरजा, वजाबाकी करण्यात दोघेही तरबेज. मधुकररावांचे वय ८५ च्या आसपास, तर हरिभाऊंना उमेदवारी दिली जाऊ नये अशी चर्चा पेरणारे त्यांचा वयाचा उल्लेख पंचाहत्तरीपार नेता असे करायचे. या दोघांनाही त्यांच्या पक्षाने आवर्जून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे फुलंब्री आणि तुळजापूर या दोन्ही मतदारसंघांतील राजकीय पट आता पुरेसा स्पष्ट झाला आहे. धोतर, टोपी असा महाराष्ट्रीय वेश असे असणारे दोन प्रमुख उमेदवार पुन्हा रिंगणात असणार आहेत.

निलंगा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, पुंडलिकराव दानवे, सिद्रामअप्पा आलुरे गुरुजी, केशवराव धोंडगे, पंडितराव दौंड आदी नेत्यांचा पेहराव असाच असायचा. शिवाजीराव निलंगेकर यांचा पेहरावही धोतर, पांढरा शर्ट, टोपी आणि पायात पांढरे मोजे असा होता; पण ते आता सक्रिय राजकारणात नाहीत. त्यांचा मुलगा अशोक पाटील निलंगेकर हे आता काँग्रेसचे उमेदवार आहेत. धोतर, टोपी घालणारे दोनच नेते तसे विधानसभेत होते. त्यात हरिभाऊ बागडे सगळ्यांच्या लक्षात येणारे.

निष्ठावान कार्यकर्ते : विधानसक्षा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे बागडे हे जनसंघापासूनचे कार्यकर्ते. परिवारातील संघटनांनी आता तुम्ही भाजपमध्ये काम करा, असे सांगितल्यानंतर ते राजकीय क्षेत्रात आले. फुलंब्री मतदारसंघातून त्यांना ७३ हजार २९४ मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. कल्याण काळे यांचा तीन हजार ६११ मतांनी त्यांनी पराभव केला होता. २००४ आणि २००९ च्या निवडणुकीत डॉ. कल्याण काळे विजयी झाले होते. तत्पूर्वी १९९५ आणि १९९९ मध्ये औरंगाबाद पूर्वमधून हरिभाऊ बागडे यांनी विजय मिळवला होता. १९९९ मध्ये ६५ हजार ५९६ मतांनी विजयी झालेल्या बागडे यांनी केशवराव औताडे यांचा पराभव केला होता. औरंगाबाद शहर आणि फुलंब्री या दोन्ही मतदारसंघांवर पकड असणारा नेता अशी हरिभाऊंची ओळख आहे. त्यांना या वेळी डॉ. कल्याण काळे यांच्याबरोबर लढत द्यावी लागेल, असे मानले जाते.

मधुकररावांसाठी आव्हान : तुळजापूर हा शेतकरी कामगार पक्षाचा मतदारसंघ; पण मधुकरराव चव्हाण यांनी या मतदारसंघावर स्वत:ची पकड मजबूत ठेवली. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या राजकारणाला विरोध करणारा नेता, अशी मधुकररावांची ओळख. त्यामुळे एवढे दिवस राष्ट्रवादीला विरोध करण्यासाठी प्रसंगी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मधुकरराव प्रोत्साहन देत असायचे. आता राणा जगजितसिंह पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली असल्याने राज्यातील काँग्रेसमधील सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तीच्या विरोधात ते कशी निवडणूक लढवतात, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. महाराष्ट्रीय वेशभूषा विधिमंडळात घेऊन जाणारे दोन उमेदवार मराठवाडय़ातील मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत.

हरिभाऊ बागडे यांना विधानसभा अध्यक्षपद आणि आधी युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद भूषविण्याची संधी मिळाली. मधुकरराव चव्हाण यांनी विधानसभा उपाध्यक्षपद व कॅबिनेट मंत्रिपद भूषविले. योगायोगाने धोतर परिधान करणारे या दोन्ही नेत्यांनी विधानसभेचे पीठासीन अधिकारीपद भूषविले आहे.

First Published on October 3, 2019 3:47 am

Web Title: maharashtra assembly election 2019 haribhau bagade madhukarrao chavan zws 70