News Flash

काँग्रेसमुळे राष्ट्रवादीचा जाहीरनामा गुलदस्त्यात

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सूर अजूनही जुळले नसल्याचे चित्र पुढे आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

विरोधाने ऐनवेळी माघार, आघाडीतील विसंवाद उघड

मुंबई : काँग्रेसच्या विरोधामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतंत्र जाहीरनामा गुलदस्त्यातच राहिला. ऐनवेळी माघार घेत, ‘आता आघाडीचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल’, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जाहीर केले. त्यामुळे युती सरकारला पराभूत करायला निघालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सूर अजूनही जुळले नसल्याचे चित्र पुढे आले आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने २००४ व २००९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढविल्या होत्या. त्यावेळी विधानसभेसाठी दोन्ही काँग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांच्या आघाडीचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. मागील २०१४ च्या विधानसभा निवडणुका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे लढविल्या होत्या. त्योवळी त्यांचे जाहीरनामेही स्वतंत्र प्रसिद्ध करण्यात आले होते.  या वेळी लोकसभा निवडणुकीपासून दोन्ही काँग्रेस एकत्र आले आहेत. आणखी काही समविचारी पक्षांना सोबत घेऊन आघाडी करून विधानसभा निवडणुका लढविण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार दोन्ही काँग्रेसमधील जागावाटपही पूर्ण झाले आहे. काँग्रेस १२५ व राष्ट्रवादी १२५ असे जागावाटप झले आहे. त्यात काही जागांची अदलाबदल करणे व मित्र पक्षांना कोणत्या जागा द्यायच्या यावर सध्या चर्चा सुरू आहे, असे मलिक यांनी सांगितले.

काँग्रेसबरोबर आघाडी नक्की असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी आपला स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचे ठरविले होते. त्यानुसार खासदार वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने जाहीरनामा तयार केला. सोमवारी त्याचे प्रकाशन करण्याचे ठरले. त्यानुसार पक्षाच्या वतीने  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, खासदार वंदना चव्हाण, आमदार हेमंत टकले आदी नेते उपस्थित झाले. मात्र, काँग्रेस व मित्र पक्षांनी विरोध केल्यामुळे राष्ट्रवादीचा स्वतंत्र जाहीरनामा आता जाहीर करण्यात येणार नाही, तर लवकरच आघाडीचा संयुक्त जाहीरनामा लोकांसमोर मांडला जाईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. आघाडी करून एकत्रितपणे निवडणुका लढवायच्या असताना प्रत्येक पक्षाचा वेगळा जाहीरनामा कशाला, असा काँग्रेस व मित्र पक्षांनी प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीत या गोंधळातून आघाडीला अजून एकीचा सूर गवसला नसल्याचे चित्र पुढे आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 3:17 am

Web Title: maharashtra assembly election 2019 ncp manifesto delay due to congress zws 70
Next Stories
1 मानखुर्दमध्ये पोलिसांवर दगडफेक
2 माहुलमध्ये पुनर्वसन नको!
3 राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचे पद रद्द
Just Now!
X