पुणे : ‘राज्यातील आगामी विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचा असेल’ असे भाकीत करणारे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय भीतीपोटी केले असावे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केले. वंचित बहुजन आघाडी राज्यातील २८८ जागांवर लढणार असून निवडणुकीनंतर आघाडीच सत्तेवर येणार असल्याचा दावा त्यांनी केला.

टाटा तसेच कोयना या धरणांचे कोकणात जाणारे पाणी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला देऊन राज्यावरील दुष्काळाचे संकट कायमचे दूर करणार असल्याची भूमिका आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली. इंग्रज सरकारशी असलेले टाटाच्या धरणांचे करारनामे रद्द करावेत, अशी मागणी करून शासनाने वाटाघाटी केल्या तर हे शक्य होऊ शकते, याकडे त्यांनी माहितीपटाच्या सादरीकरणाद्वारे लक्ष वेधले. आंतरराज्य पाणी लवादाने पाण्याच्या वाटपाबद्दल निर्णय देताना या धरणांचे पाणी वीज निर्मितीसाठी वापरायला विशेष परवानगी दिली होती. हे पाणी पूर्वेकडे वळविल्यास त्यातील तीन चतुर्थाश वाटा आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांना जाईल, असे नोकरशाहीने सांगितल्यामुळे राज्यातील सरकारने निर्णय घेतला नसल्याचा दावा त्यांनी केला. वीज निर्मितीसाठी लागणारे पाणी दुष्काळी भागाला पुरविण्याची वंचित आघाडीची ही अधिकृत भूमिका असून कोणालाही पाण्यापासून वंचित ठेवणार नाही. सत्तेत आल्यानंतर आम्ही हे नक्की करू , अशी ग्वाही आंबेडकर यांनी या वेळी दिली.

सत्तेमध्ये आल्यावर प्रत्येक भागात पाणी पोहोचवणार : प्रकाश आंबेडकर

काही पक्ष धर्माच्या नावावर तर, काही धर्मनिरपेक्षतेच्या मुद्दय़ावर निवडणूक लढत आहेत. वंचित बहुजन आघाडी माणसाच्या जीवनाशी निगडित प्रश्नावर निवडणूक लढत आहे. काँग्रेस आणि भाजपने काही जातींनाच उमेदवारी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. आम्ही सर्व जातींसाठी उमेदवारी खुली करून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणले आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले.

.ओवैसी यांच्याशी उत्तम संबंध

वंचित आघाडी आणि एमआयएम यांची युती होणार का, या विषयी विचारले असता ‘माझे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्याशी उत्तम संबंध आहेत’, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी कुलूप लावून ठेवले आहे. किल्ली लावून कुलूप उघडले नाही तर उपयोग काय?, असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला. ‘माझ्याकडून चर्चेचे दरवाजे उघडे आहेत’, असे सांगतानाच आंबेडकर यांनी ‘एमआयएम’शी आघाडी झाली नाही तरी राज्यातील बहुतांश मुस्लिम संघटनांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा जाहीर केला असल्याचे स्पष्ट केले.