30 October 2020

News Flash

परंड्यात रंगणार तुल्यबळ लढत; मोटे-सावंतांचे सर्वस्व पणाला

शरद पवारांची नेत्याना समज

-मुजीब काझी

परंडा विधानसभा मतदारसंघात उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी पक्षाकडून उमेदवारी होण्यापूर्वीच प्रचाराचा एक टप्पा पूर्ण केला होता. तर राज्यात राष्ट्रवादीची पडझड होत असतानाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही चौथ्यांदा विद्यमान आमदार राहुल मोटे यांना पक्षाची उमेदवारी देऊन प्रचारसभा घेतली. सांवत व मोटे हे पूर्ण ताकदीने प्रचारात उतरले आहेत. विजयश्री खेचून आणण्यासाठी दोन्ही नेत्यांनी सर्वस्व पणाला लावले आहे.

परंडा विधानसभा मतदारसंघ भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात परंडा-भूम-वाशी या तीन तालुक्यांचा समावेश होतो. या तीन तालुक्यात २४२ गावे आणि ३७९ मतदान केंद्र आहेत. यामध्ये ३ लाख १३ हजार ७६७ मतदार आहेत.
शिवसेनेत आक्रमकतेसाठी प्रसिद्ध असणारे जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांची या मतदारसंघातून विधानसभेची पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे त्यांच्या गटासाठी ही अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहुल मोटे हे या मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आलेले आहेत. ते चौथ्यांदा निवडणूक लढवत असून, या मतदारसंघावर त्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळेच पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. असे असले तरी ही निवडणूक मात्र राहुल मोटे यांना सोपी नाही. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले सेनेचे सावंत बलाढ्य आहेत. त्यांचा राज्याच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. ते मोटे यांच्या नंतर येऊन पालकमंत्रीही झाले. तसेच मातोश्रीवरही त्यांचे वजन आहे.

संयमी व शांत स्वभावासाठी परिचित असलेले राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटे या मतदारसंघाचे सलग पंधरा वर्षापासून प्रतिनिधीत्व करतात. मोटे यांना मानणारे कार्यकर्ते तीनही तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची पत्नी वैशाली मोटे यांनी या तालुक्यांमध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवला आहे.

शरद पवारांची नेत्याना समज-

राहुल मोटे यांच्या प्रचारासाठी आलेल्या शरद पवारांनी परंडा, भूम, वाशी या तालुकापातळीवरील काही नेत्यांना समज दिली असल्याचे सांगितले जाते. “या मतदारसंघातून तुम्ही राहुलला निवडुन आण मी त्याला मंत्री बनवतो. या भागातील शेतकऱ्यांसाठी उजनीचे पाणी आल्याशिवाय विकास होणार नाही. म्हणुन राहुलला निवडूण आणा पाण्याचे मी पाहतो,” असे आश्वासनही पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे.

गत विधानसभा निवडणुकीपेक्षा वेगळे चित्र

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा २०१९ मधील निवडणुकीचे चित्र वेगळे आहे. गत निवडणुकीत सर्व पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढविल्या होत्या. यंदा भाजप-सेनेची युती, तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहेत. त्याचा मोठा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे. तर भाजप-सेनेतील नेत्यांनी आयाराम गयारामांना उमेदवारी दिल्याने अनेकांनी बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. याचा फटका युतीला बसण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2019 5:00 pm

Web Title: maharashtra assembly election big fight between rahul mote and tanaji sawant in paranda constituency bmh 90
Next Stories
1 हा नियतीचा अजब खेळ आहे; ‘त्या’ सल्ल्यावरून चव्हाणांनी ठेवलं तावडेंच्या वर्मावर बोट
2 मराठवाडय़ाच्या राजकारणातील नात्यागोत्याची व्याप्ती मोठी
3 आजही बाळासाहेबांना खांद्यावर उचलून घेण्यास तयार : असदुद्दीन ओवेसी
Just Now!
X