महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराच्या हृदयाची धडधड वाढली आहे. केंद्रातील सत्ता ठरवण्यात जशी महाराष्ट्राची भूमिका आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सत्तेच्या अनुषंगानं मराठवाड्याकडं बघितलं जातं. एकून २८८ आमदारांपैकी ४६ आमदार मराठवाड्यातून निवडून येतात. त्यामुळे सर्वांचं लक्ष मराठवाड्याकडं मराठवाड्याकडं असणार आहे. यंदा होत असलेल्या निवडणुकीतही मराठवाड्यातून सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी युतीने प्रयत्न सुरू केले आहेत. तर काँग्रेसने-राष्ट्रवादीनेही अखेरच्या टप्प्यात कंबर कसली आहे.

मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई होत आहे परळी विधानसभा मतदारसंघात. राज्याच्या ग्रामविकास मंत्री आणि नेत्या पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे एकमेकांविरूद्ध निवडणूक लढवत आहेत. दोन्ही नेते त्यांच्या पक्षाचे मराठवाड्यातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची झाली आहे. त्यात मतदानाच्या अखेरच्या दिवशी धनंजय मुंडे यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ, भाषणानंतर कोसळलेल्या पंकजा मुंडे, त्यानंतर दोघांचीही भावूक साद घालणारी पत्रकार परिषद यामुळे मतदारसंघातील चूरस वाढल्याचे दिसले. त्याचबरोबर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी विजयाचा गुलाल उधळण्यासाठी बाजी लावली आहे.

जालना विधानसभा मतदारसंघातही एक चुरशी निवडणूक पाहायला मिळणार आहे. २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेचे अर्जून खोतकर यांनी काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचा पराभव करत सणसणाटी विजय मिळवला होता. यावेळीही अर्जून खोतकर आणि गोरंट्याल यांच्या लढत होत आहे. गेल्यावेळी चारही पक्ष स्वतंत्र असल्याने मतविभाजन झालं होतं. यावेळी युती आघाडी असली, तरी भाजपा शिवसेनेला किती सहकार्य करतं यावर निकाल अवलंबून असेल.

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघात विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्यात लढत असणार आहे. या निवडणुकीत भाजपाने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारलं. मात्र, बागडे यांना दिलं. त्यामुळे बागडे यांच्या ही लढत प्रतिष्ठेची असणार आहे. तर काँग्रेसचे कल्याण काळे यांचंही मतदारसंघात वजन असून, ते चांगली लढत देऊ शकतात. इतर स्थानिक समीकरणंही निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकतात.

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचा निकाल महत्त्वाचा असणार आहे. हा मतदारसंघ भाजपाकडे होता. यावेळी तो शिवसेनेकडं आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. सत्तार भाजपात जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांचा सत्तार यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध होता. त्यामुळे सत्तार यांनी शिवबंधन बांधत राजकीय पुनर्वसन करून घेतले. पण भाजपा पदाधिकाऱ्यांचा विरोध अद्यापही माळलेला नाही. भाजपा नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रभाकर पालोदकरांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यस्तरावर युती असली तरी स्थानिक पातळीवर बंडखोरी उफाळली आहे. त्यांचा फटका सत्तार यांना बसू शकतो.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार अशोक चव्हाण हे भोकर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचे श्रीनिवास गोरठेकर हे निवडणूक लढवत आहेत. वंचित बहुजन आघाडीनेही नामदेव आयलवाड यांना उमेदवारी दिली आहे. भोकर हा अशोक चव्हाणांचा मतदारसंघ असून त्यांचे पारडे जड आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांना वंचित आघाडीच्या उमेदवारामुळे पराभव स्वीकारावा लागला होता. भाजपाने या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केलं असून, त्याचबरोबर वंचित फॅक्टरही महत्त्वाचा ठरणार आहे.

याचबरोबर औसा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे बसवराज पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. पवार यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक भाजपा कार्यकर्ते नाराज आहेत. त्यात बजरंग जाधव यांनी पवार यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा निकालही भाजपा आणि काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे.