राज्यात सरासरी ६० टक्के मतदान; हिंसाचाराचे गालबोट

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत मतदारांमध्ये उत्साह दिसला नाही. ग्रामीण भागांत मतदान चांगले झाले असले तरी मुंबईसह शहरी भागांत मतदानाची टक्केवारी रोडावली. राज्यात सरासरी ६०.४६ टक्के मतदान झाले. कोल्हापूर जिल्ह्य़ात सर्वाधिक ७३ टक्के मतदानाची नोंद झाली.

गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात ६२.५८ टक्के मतदान झाले होते. या तुलनेत विधानसभेत अडीच टक्के मतदान कमी झाले. तर २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत सुमारे ६४ टक्के मतदान झाले होते. या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी घसरली आहे.  विदर्भात एका उमेदवारावर झालेला हल्ला आणि काही ठिकाणी झालेल्या हाणामाऱ्या हे अपवाद वगळता अन्यत्र मतदान शांततेत पार पडले.

रविवारी राज्याच्या अनेक भागांमध्ये झालेला पाऊस आणि मतदानाच्या दिवशी पाऊस पडण्याचा हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाने निवडणूक  यंत्रणा आणि उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पण सांगली आणि कोल्हापूरमध्ये सकाळीच पाऊस थांबल्याने दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढली. रत्नागिरी जिल्ह्य़ात दुपारनंतर पाऊस सुरू झाला. गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने काही ठिकाणी मतदान केंद्रांबाहेर चिखल झाला होता. याचा मतदारांना त्रास झाला. कोठेही मुसळधार पाऊस न झाल्याने मात्र दिलासा मिळाला. मतदान पूर्ण झाल्यावर काही उमेदवारांनी विजयोत्सव साजरा केला. फटाके फोडून, पेढे वाटून काही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

शहरांमध्ये मतदान कमी

मुंबई, ठाणे, पुणे या शहरी भागांमध्ये मतदान कमी झाले. मुंबई शहर जिल्ह्य़ात ४८.६३ टक्के तर मुंबई उपनगरात ५१.१७ टक्के मतदान झाले. मुंबईत सरासरी ५० टक्के मतदान झाले. लोकसभा निवडणुकीतही मुंबईत ५० ते ५२ टक्के एवढेच मतदान झाले होते. ठाणे जिल्ह्य़ात ४७.९१ टक्के, पुणे शहरात ४८ टक्केच मतदान झाले. नागपूर शहरातही  कमी मतदान झाले.

हिंसाचाराचे गालबोट

राज्याचे कृषिमंत्री आणि भाजपचे उमेदवार डॉ. अनिल बोंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी पुरस्कृत स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सोमवारी पहाटे अज्ञातांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. हल्लेखोरांनी त्यांची कारही पेटवून दिली. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी-एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. खासदार इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की झाली. भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. जालना जिल्ह्य़ात बदनापूर येथे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी

१. अहमदनगर – ६४.९३ टक्के

२. अकोला – ५६.८८ टक्के

३. अमरावती – ५९.३३ टक्के

४. औरंगाबाद – ६५.०६ टक्के

५. बीड – ६८.०३ टक्के

६. भंडारा – ६६.३५ टक्के

७. बुलडाणा – ६४.४१ टक्के

८. चंद्रपूर – ६३.४२ टक्के

९. धुळे – ६१.९० टक्के

१०. गडचिरोली – ६८.५९ टक्के

११. गोंदिया – ६४.०६ टक्के

१२. हिंगोली – ६८.६७ टक्के

१३. जळगाव – ५८.६० टक्के

१४. जालना – ६७.०९ टक्के

१५. कोल्हापूर – ७३.६२ टक्के

१६. लातूर – ६१.७७ टक्के

१७. मुंबई शहर – ४८.६३ टक्के

१८. मुंबई उपनगर – ५१.१७ टक्के

१९. नागपूर – ५७.४४ टक्के

२०. नांदेड – ६५.४० टक्के

२१. नंदुरबार – ६५.५० टक्के

२२. नाशिक – ५९.४४ टक्के

२३. पालघर – ५९.३२ टक्के

२४. परभणी – ६७.४१ टक्के

२५. पुणे – ५७.७४ टक्के

२६. रायगड – ६५.९० टक्के

२७. रत्नागिरी – ५८.५९ टक्के

२८. सांगली – ६६.६३ टक्के

२९. सातारा – ६६.६० टक्के

३०. सिंधुदुर्ग – ६४.५७ टक्के

३१. सोलापूर – ६४.२३ टक्के

३२. ठाणे – ४७.९१ टक्के

३३. उस्मानाबाद – ६२.२१ टक्के

३४. वर्धा – ६२.१७ टक्के

३५. वाशिम – ६१.३३ टक्के

३६. यवतमाळ – ६३.०९ टक्के

———————–

एकूण – ६०.४६ टक्के

———————-

लोकसभा निवडणुकीत मतदानाची राज्यातील टक्केवारी

२००९ – ५३.६७ टक्के

२०१४ – ६२.२४ टक्के

२०१९ – ६२.५८ टक्के

विधानसभा निवडणुकीतील टक्केवारी

२००९ – ६१.५५ टक्के

२०१४ – ६४.३३ टक्के

वाद अन् धक्काबुक्की

* औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी-एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. खासदार इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की. भाजप – सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष

* जालना जिल्ह्य़ात बदनापूर येथे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

* कल्याणमध्ये निवडणूक कामावर असताना जयराम तरे या पोलीस कर्मचाऱ्याला आणि कोल्हापुरात निवडणूक कर्मचारी सर्जेराव भुसे यांना हृदयविकाराचा झटका. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू

* ठाण्यात सुनील खांबे या कार्यकर्त्यांकडून मतदान करताना ईव्हीएमवर शाईफेक आणि ईव्हीएमविरोधात घोषणाबाजी

* कळवा-मुंब्रा आणि ओवळा-माजिवडा या मतदारसंघांमध्ये सायंकाळी मतदारांनी मोठी गर्दी. त्यामुळे सहावाजेपर्यंत रांगेत लागलेल्यांचे मतदान रात्री उशिरापर्यंत