12 November 2019

News Flash

अशोक चव्हाण मतदारसंघातच अडकले

ग्रामीण भागातील मतदारांसी संपर्ख साधण्यावर त्यांनी भर दिल्याचे सांगण्यात येते.

अशोक चव्हाण

लोकसभेतील पराभवाने सावध

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यासाठी भोकर विधानसभेची लढाई अस्तित्वाची ठरणार आहे. ४१ वर्षांपूर्वी काँग्रेसचे नेते शंकरराव चव्हाण आणि बाबासाहेब गोरठेकर यांच्यात लढत झाली होती. आता त्या दोघांचे चिरंजीव अशोक चव्हाण आणि बापूसाहेब गोरठेकर निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे भोकरच्या लढाईत दोन्ही प्रतिस्पर्धी रात्रीचा दिवस करत आहेत. गेल्या काही दिवसांत नांदेड जिल्ह्य़ाबाहेरील एकाही मतदारसंघात फारसे न दिसणारे अशोक चव्हाण आता जिल्ह्य़ातील प्रचारासाठी हेलिकॉप्टरचा वापर करू लागले आहेत. ग्रामीण भागातील मतदारांसी संपर्ख साधण्यावर त्यांनी भर दिल्याचे सांगण्यात येते.

भारतीय जनता पक्षाने बापूसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी या मतदारसंघाचे ‘आमदार’ म्हणून अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण याच कारभार पाहत होत्या, असा प्रचार भाजप करीत आहे. मात्र, गोरठेकरांची ही निवडणूक शेवटची निवडणूक असेल, त्यामुळे त्यांना संधी द्या, असे आवाहन खासदार चिखलीकर करत आहेत. पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये काँग्रेसचा वरचष्मा असणाऱ्या भोकर मतदारसंघात मुख्यमंत्री असताना चव्हाण यांनी विकास केला नाही, हा भाजपचा प्रचारातला मुद्दा असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बहुतांश नेतेमंडळी अशोक चव्हाण यांच्यामागे असल्याचे सांगण्यात येते. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांतील ही निवडणूक अशोक चव्हाण यांच्यासाठी अधिक महत्त्वाची मानली जाते. कारण, लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या नेत्यांनी नांदेड जिल्ह्य़ात पाय पसरायला सुरुवात केली आहे. प्रमुख नेत्याला चहुबाजूने घेरायचे म्हणजे तो गड आपल्या ताब्यात येतो, अशी व्यूहरचना केली जाते. त्यामुळे प्रत्येक गावात आणि तेथील कार्यकर्त्यांबरोबर चव्हाण दररोज संपर्कात असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात.

भोकर मतदारसंघात अडकून पडल्याने काही मोजक्याच सभा नांदेड जिल्ह्य़ात चव्हाण यांनी घेतल्या. लातूर येथे राहुल गांधी यांच्या सभेला त्यांनी हजेरी लावली होती. कळमनुरी येथेही त्यांची एक सभा होणार आहे, असे सांगण्यात येते. मात्र, मराठवाडय़ातील काँग्रेसच्या उमेदवारांसाठी चव्हाण यांनी झंझावाती प्रचार केला, असे चित्र काही दिसले नाही. मराठवाडय़ाचे काँग्रेसचे प्रमुख नेते अशी त्यांची ओळख असली तरी सध्या मात्र ते स्वत:चा मतदारसंघ टिकवण्यासाठी विशेषत्वाने काम करत आहेत.

First Published on October 18, 2019 3:54 am

Web Title: maharashtra assembly elections 2019 ashok chavan stuck in his constituency zws 70