लोकसभा निवडणुकीत युतीचा वरचष्मा

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस व  राष्ट्रवादी आघाडीच्या मतांमध्ये सुमारे एक कोटीचा फरक असून, मते कायम राखण्याचा युतीचा प्रयत्न असला तरी जास्तीत जास्त मते वळविण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे.

सहा महिने ते वर्षभराच्या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये निकालांमध्ये फार काही फरक पडत नाही, असा देशातील अनेक राज्यांमधील निवडणुकांमधील अनुभव आहे. काही अपवाद वगळल्यास साधारणपणे हाच कल कायम राहतो. लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि अन्य मित्र पक्षांच्या महायुतीला एकूण मतदानाच्या ५१ टक्के मते आणि एकूण पावणे तीन कोटी मते मिळाली होती. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला ३२ टक्के मतदान झाले असून, एकूण मते ही १ कोटी ७१ लाखांच्या आसपास आहेत. याचाच अर्थ भाजप आणि शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या मतांमध्ये एक कोटींपेक्षा जास्त मतांचा फरक होता.

वंचित बहुजन आघाडी, बसपा, अपक्ष किंवा अन्य छोटय़ा पक्षांना ७८ लाख ६५ लाख मते मिळाली होती. मतांची टक्केवारी १४.६ टक्के होती. यापैकी वंचित बहुजन आघाडीला ४१ लाख मते मिळाली होती. बसपाला एक टक्काही मते मिळाली नाहीत.

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपचे २३, तर शिवसेनेचे १८ असे एकूण ४१ उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादी चार, तर काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली होती. एक जागा एमआयएमला, तर एक जागा अपक्षाला मिळाली होती.

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला पावणे दोन कोटींपेक्षा जास्त मते मिळाली होती. एवढी किंवा त्यापेक्षा जास्त मते विधानसभा निवडणुकीत मिळतील, असा महायुतीचा प्रयत्न आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे आहे.  जम्मू आणि काश्मीरचा विशेषाधिकार रद्द करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा राज्यातील मतदारांवर प्रभाव पडला आहे. राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या  कामांमुळे मतांच्या प्रमाणात वाढ होईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

आघाडीला लोकसभा निवडणुकीत दीड कोटींपेक्षा जास्त मते मिळाली. विधानसभेची निवडणूक ही स्थानिक प्रश्नांवर लढली जाते. यामुळे आघाडीच्या मतांमध्ये नक्कीच वाढ होईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणूक २०१९ : पक्षांना मिळालेली मते

भाजप १ कोटी ४९ लाख मते (२७.६ टक्के)

शिवसेना १ कोटी २५ लाख मते (२३.३ टक्के)

काँग्रेस ८७ लाख ९२ हजार (१६.३ टक्के)

राष्ट्रवादी ८३ लाख ८७ हजार (१५.५ टक्के)

अन्य वंचित आघाडी, बसपा, अपक्ष एकत्रित ७८ लाख ६५ हजार (१४.६ टक्के)

वंचित आघाडी  ४१ लाख