मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील समसमान जागांचे सूत्र मान्य करून आकडय़ांचा वाद मिटला, परंतु काही मतदारसंघांच्या अदलाबदीलाचा घोळ कायम असून हा घोळ लवकरात लवकर मिटविण्यासाठी आता दोन्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
केंद्रात व राज्यात सत्तेत असताना काँग्रेस-राष्ट्रवादीत कुणी किती जागा लढवायच्या यावरूनच उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत घोळ सुरू राहायचा. १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका त्या पक्षाने स्वतंत्रपणे लढविल्या होत्या. त्यानंतर २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीत समविचारी पक्षांना बरोबर घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीने निवडणूकपूर्व आघाडी केली होती. मात्र त्या वेळी दोन्ही काँग्रेसमध्ये जागावाटपावरून वाद झाला होता. अखेर काँग्रेसने १५७ व राष्ट्रवादी काँग्रेसने १२४ जागांवर समझोता केला. २००९ मध्ये राष्ट्रवादीचा आकडा आणखी कमी झाला. त्या वेळी काँग्रेसने १७० व राष्ट्रवादीने ११३ जागा लढविल्या होत्या.
मागील २०१४ च्या निवडणुकीत पन्नास-पन्नास टक्के म्हणजे १४४-१४४ असे जागावाटप करावे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी होती. काँग्रेसने ती मान्य केली नाही. मात्र त्या आधीच दोन्ही काँग्रेसमध्ये कटुता निर्माण झाली आणि आघाडी विस्कटली. दोन्ही काँग्रेसने स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणुका लढविल्या. त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला.
या वेळी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपात समजुतीची भूमिका घेऊन काँग्रेसने १२५ व राष्ट्रवादी काँग्रेसने १२५ जागा लढवाव्यात व मित्र पक्षांना ३८ जागा सोडण्याचे ठरले. म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसपुरते पन्नास-पन्नास टके जागावाटपाचे सूत्र मान्य करण्यात आले. आकडय़ांचा वाद मिटला, परंतु काही अदलाबदलींच्या जागांवरून घोळ सुरू आहे. त्यामुळे आघाडीची अधिकृत घोषणाही अजून झालेली नाही. २०१४ मध्ये दोन्ही काँग्रेसच्या मतविभाजनाचा भाजप व शिवसेनाला फायदा झाला होता. त्यामुळे अदलाबदलीच्या जागांवरून निर्माण झालेला वाद घोळ मिटवून लवकरच आघाडीची घोषणा करावी यासाठी उभय पक्षांत एकमत असल्याचे सांगण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 27, 2019 3:00 am