News Flash

विदर्भात इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे भाजपमध्ये अस्वस्थता

युतीचे जागावाटप निश्चित झाल्यावर ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उमेदवारीची आशा नसलेले अनेकजण अन्य पक्षांच्या संपर्कात?

नागपूर : नागपूरसह विदर्भात इतर पक्षांतून भाजपमध्ये येणाऱ्यांचे प्रमाण नगण्य असले तरी इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे उमेदवारीची खात्री नसल्याने ऐनवेळी निराशा नको म्हणून भाजपच्या काही नेत्यांनी अन्य पक्षांकडे गळ टाकून ठेवला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. भाजपचे हिंगण्याचे (जि. नागपूर) माजी आमदार विजय घोडमारे यांनी अलीकडेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय पूर्व विदर्भातील शिवसेनेचे एक माजी आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. युतीचे जागावाटप निश्चित झाल्यावर ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये नागपूर किंवा पूर्व विदर्भातील नेत्यांची संख्या नगण्य आहे. खुद्द नागपुरातूनही अनेक नावांची चर्चा असली तरी अद्याप एकही मोठा नेता भाजपच्या गळाला लागलेला नाही. दुसरीकडे प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारी देताना पक्षाला कसरतच करावी लागणार आहे.

नागपूर शहारातील सर्व सहा विधानसभा जागांसाठी पक्षाने मुलाखती घेतल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (दक्षिण पश्चिम) आणि कृष्णा खोपडे (पूर्व) यांच्या मतदारसंघाचा अपवाद केला, तर इतर ठिकाणी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने पक्षाचीही चिंता वाढली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत उत्तरमध्ये पक्षाला काँग्रेसच्या तुलनेत कमी मते मिळणे, मध्य आणि दक्षिण या मतदारसंघातही अपेक्षित मत्ताधिक्य न मिळणे यामुळे येथे नवीन चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते, असे संकेत पक्षातीलच वरिष्ठांनी दिल्याने विद्यमान आमदार धास्तावले आहेत.

२०१४ ची निवडणूकभाजप-सेना स्वतंत्र लढल्याने सेनेच्या पारंपरिक मतदारसंघात भाजपने विजय मिळवला. यात नागपूर जिल्ह्य़ातील रामटेक, वर्धा जिल्ह्य़ातील हिंगणघाट या दोन प्रमुख जागांचा समावेश आहे. या जागा भाजपकडेच कायम राहिल्यास येथील सेनेचे इच्छुक इतर पर्याय निवडू शकतात. भंडारा जिल्ह्य़ात दोन जागांवर भाजप नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे.

याच भागातील सेनेचे माजी आमदारही त्यांना उमेदवारी न मिळाल्यास इतर पक्षांमार्फत लढण्याची तयारी करीत आहेत. हे सर्वजण युतीच्या जागावाटपात कोणते मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाटय़ाला येतात यावर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा नुकतीच नागपूरमध्ये येऊन गेली. या काळात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काही इच्छुकांनी भेट घेतली होती. त्यापैकी भाजपचे हिंगण्याचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्याशिवाय नागपूर शहरातील दोन मतदारसंघांतील काही इच्छुकांनीही पाटील यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष वेदप्रकाश आर्य यांनी याला दुजोरा दिला. पण, त्यांनी नावे सांगितली नाहीत. आघाडीत राष्ट्रवादीसाठी शहरातील कोणते मतदारसंघ सुटतात यावरच इतर पक्षांच्या इच्छुकांचा प्रवेश अवलंबून असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. भंडारा जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीचे नेते धनंजय दलाल यांनीही येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले.

उत्तर नागपूरमध्ये काही नेते वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात आहेत. या भागातील भाजपचे विद्यमान आमदार डॉ. मिलिंद माने पुन्हा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने त्यांनी तयारीही सुरू केली आहे. भाजपचा कुठलाही नेता वंचितच्या संपर्कात नाही, असे त्यांनी ठासून सांगितले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे भाजपमधून कोणीही इतर पक्षांत जाण्याचा प्रश्नच येत नाही. राहिला प्रश्न इच्छुकांचा तर एकाला उमेदवारी मिळाल्यावर इतर सर्वजण पक्षाचे काम करण्यास तयार आहेत. भाजपनेते पक्ष सोडणार या केवळ अफवा आहेत.

– गिरीश व्यास, आमदार- प्रवक्ते, भाजप

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 3:46 am

Web Title: maharashtra assembly elections 2019 discomfort in vidarbha bjp due to aspirants zws 70
Next Stories
1 ‘अस्मिता लाल’ निर्मितीचा राज्यातील पहिला प्रयोग अकोल्यात
2 अश्लीलतेचा ठपका ठेवत पहिलीतील मुलाला शाळेतून काढले
3 आजोबाचा खून करून २५ तोळे सोने लुटले