अनेक ठिकाणी भाऊबंदकीचा उद्रेक

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत चालले असताना प्रमुख पक्षाच्या इच्छुक उमेदवारांना भाऊ बंदकीच्या त्रासाने त्रस्त केले आहे. घराण्यातील यादवी ऐन निवडणुकीत उफाळून आली असल्याने ही अडचण कशी दूर करावी याची विवंचना उमेदवारांना सतावू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील-पक्षाचे जिल्हाधक्ष ए. वाय. पाटील, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके- त्यांचे चुलत बंधू संदीप नरके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार संध्यादेवी कुपेकर-शिवसेनेची उमेदवारी मिळालेले त्यांचे पुतणे संग्रामसिंह कुपेकर अशा बडय़ा घराण्यात राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. उमेदवारीचा हक्क, जुने उट्टे, मतभेद अशी या वादाची वेगवेगळी कारणे आहेत.

विधानसभा निवडणुकीचा गड सर करून आमदारकीची खुर्ची मिळवणे हे तालुका पातळीवर कार्यरत असणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांचे स्वप्न असते. त्यासाठी वाट्टेल त्या तडजोडी करण्याबरोबरोबरच अगदी निकटच्या व्यक्तीचे पाय ओढण्यापर्यंत नाना करामती केल्या जात असल्याचे राजकीय वर्तुळात दिसत असते. आता विधानसभा निवडणुकीत अशा घटना, कारवायांना ऊत आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हा वाद ऐरणीवर आला आहे.

पाटील पाहुणे-मेहुणे हातघाईवर

राधानगरी-भुदरगड या दोन तालुक्याचा मिळून असणारा विधानसभा मतदारसंघ सध्या पाहुण्या-मेहुण्याच्या राजकीय शह-काटशह यामुळे गेली ३-४ वर्षे गाजत आहे. आता पक्षाची उमेदवारी जाहीर करण्याची वेळ आली तरी माजी आमदार के. पी. पाटील आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यातील वाद मिटण्याचे नाव घेईना. पक्षाचे जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी तडजोडीचा प्रयत्न करूनही त्याला यश आले नाही. यामुळे आता हा वाद थेट बारामतीकरांकडे सोपवला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे या पाहुण्या-मेहुण्याची एकत्र बैठक होणार आहे. हा अखेरचा मार्ग तरी वाद मिटवण्यात प्रभावी ठरतो का, याकडे पक्षाचे लक्ष लागले आहे. के. पी. पाटील यांना उमेदवारी दिल्यास पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन ए. वाय. पाटील आखाडय़ात उतरणार असल्याचे समर्थक सांगत आहेत. घरातील या वादाचा लाभ शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांना होऊ शकतो.

कुपेकर पुन्हा आमने सामने

आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्या कन्या नंदिनी बाभुळकर यांनी रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. मात्र येथे शिवसेनेची उमेदवारी कुपेकर यांचे पुतणे संग्रामसिंह कुपेकर यांना मिळाली आहे. त्यामुळे कुपेकर घराण्यातच राजकीय संग्राम अटळ असल्याचे मानले जात आहे.

नरकेंची कोंडी

करवीर मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके यांच्यासमोर चुलत बंधू संदीप नरके यांनी अडचण निर्माण करीत काँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार पी. एन. पाटील यांना पाठिंबा दिला आहे. संदीप नरके यांनी मागे आक्रमक भूमिका घेत कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत ‘एक व्यक्ती, एक पद’नुसार कारखान्याचे नेतृत्व आपल्याकडे द्यावे अशी मागणी कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांच्याकडे केली होती. ती नाकारण्यात आल्यावर निवडणूक झाली असता संदीप यांचा पराभव झाला. तर जिल्हा परिषद निवडणुकीत चंद्रदीप नरके यांनी त्यांचे बंधू अजित नरके यांना रिंगणात उतरवले असता ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचे चिरंजीव संदीप नरके यांचा पराभव झाला होता. हा जुना हिशोब चुकता करण्यासाठी संदीप हे आता चंद्रदीप यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. तर,  अरुण नरके यांनी मात्र पुतण्या चंद्रदीप यांची पाठराखण करण्याचे ठरवले असल्याने हा घरातील वाद कसे वळण घेतो हे लक्षवेधी ठरले आहे.