बारामतीतील कांबळेश्वर मतदान केंद्रावर अनोखी शक्कल

पुणे : बारामती तालुक्यात रविवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने कांबळेश्वर मतदान केंद्राच्या आवारात गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने मतदानाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, ग्रामस्थ तसेच मतदान अधिकाऱ्यांनी एक अनोखी शक्कल लढवित गावातून ट्रॅक्टरच्या ट्रॉली जमा केल्या आणि त्याच्या साहाय्याने मतदान केंद्रापर्यंत सेतू तयार केला. त्याचा वापर करून मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. या प्रयोगाची नोंद केंद्रीय निवडणूक आयोगानेही घेतली.

बारामती परिसरात रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नीरा नदीला पूर आला आहे. या नदीच्या काठावरच कांबळेश्वर हे गाव आहे. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, पावसामुळे शाळेच्या मैदानात गुडघ्यापर्यंत पाणी भरले होते. सकाळी पाऊस थांबला असला, तरी मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी या पाण्यातून जाणे अनेकांना शक्य नव्हते. त्यामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे ग्रामस्थ आणि मतदान अधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेत गावातून ट्रक्टरच्या ट्रॉली जमा केल्या. त्या एकमेकांना जोडत शाळेच्या प्रवेशद्वारापासून मतदान केंद्रापर्यंत सेतू तयार केला. या सेतूवरून जात दिवसभर मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. त्यामुळे या केंद्रात ६० टक्क्य़ांहून अधिक मतदानाची नोंद झाली.

मतदानासाठी लढविलेल्या या अनोख्या प्रयोगाची थेट केंद्रीय निवडणूक आयोगानेही दखल घेत जिल्हा प्रशासनाचे कौतुक केल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. मतदान केंद्राच्या परिसरात पावसाचे पाणी किंवा चिखल झालेल्या जिल्ह्यातील सुमारे चारशे ते साडेचारशे मतदान केंद्रांमध्ये विविध प्रयोग राबवून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.