महायुतीच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा; बॉम्बस्फोटातील आरोपींना मदत करणाऱ्यांना लाथाडण्याचे आवाहन

मुंबई : बँकिंग व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या आणि करोडो रुपयांचे घोटाळे करणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांना कोणतीही शक्ती वाचवू शकणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिला. तत्कालीन सत्ताधाऱ्यांशी लागेबांधे असल्यानेच १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील सूत्रधारांवर कारवाई झाली नव्हती, असा आरोप करून या पक्षांना निवडणुकीत लाथाडावे, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

भाजप महायुती सरकारच्या हाती मुंबई आणि देश सुरक्षित असून पुन्हा मुंबईत अतिरेकी हल्ल्यासारखी आगळीक करण्याची हिम्मत सीमेपलीकडून  होणार नाही. तसा कोणी प्रयत्न केलाच तर सर्जिकल स्ट्राइक, बालाकोटसारखे चोख प्रत्युत्तर दिले जाईल अशी दहशत शत्रूमध्ये आज निर्माण झाली आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले. महायुतीच्या प्रचाराची सांगता मोदी यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले आदी महायुतीचे नेते उपस्थित होते.

मिरचीचा व्यापार करणारे मिर्चीशी आर्थिक व्यवहार करतात, असा टोला मोदी यांनी दाऊदचा सहकारी इक्लाब मिर्ची याच्याशी असलेल्या आर्थिक संबंधावरून ‘ईडी’कडून चौकशी सुरू असलेल्या राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांना लगावला.

मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख भ्रष्टवादी असा केला. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडल्याबद्दल विरोधी सरकारला जबाबदार धरून ते मार्गी लावल्याने फडणवीस सरकारचे कौतुक केले. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून येथे अलौकिक बुद्धिमत्ता असल्याने जगभरातून गुंतवणुकीचा ओघ येत आहे. प्रामाणिक करदात्यांना कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही आणि कर बुडविणाऱ्यांना वचक बसेल, असे सरकारचे धोरण राहील, हेही त्यांनी नमूद केले. मोदी आणि फडणवीस सरकारच्या कामगिरीचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुक करून शिवसेनेच्या वचननाम्यातील आश्वासनांचा उल्लेख केला. युती सरकार ते पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुकंपा तत्त्वावर मतांचा जोगवा मागितला जात असून जनता त्याला बळी पडणार नाही, असे टीकास्त्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडले. आम्ही विजयी होणारच, असा विश्वास व्यक्त करून आम्हाला त्यासाठी ईडीची गरज नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.  पवारांच्या विधानांचाही त्यांनी समाचार घेतला.

आरेवरून शिवसेनेवर दबाव

आरेमधील वृक्षतोडीवरून शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे. मोदी यांच्या सभेत शिवसेनेने हा मुद्दा काढला असता तर त्यातून वेगळा अर्थ झाला असता. यामुळेच मोदी यांच्या सभेत आरेचा मुद्दा काढू नये यासाठी भाजपकडून शिवसेनेच्या नेतृत्वावर दबाव आणण्यात आला होता, असे भाजपमधील सूत्राने सांगितले. यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आरेचा विषय टाळल्याचे समजते.

बँकिंग आणि अन्य घोटाळ्यांतील आरोपी तिहार आणि मुंबईतील तुरुंगात  आहेत. तत्कालीन सरकारमुळे मोबाइल बँकिंगद्वारे करोडो रुपये बदमाशांच्या बँकेत जमा झाले होते. आमचे सरकार कोणालाही सोडणार नसून त्यांना आता कोणीही वाचवू शकणार नाही. 

– पंतप्रधान नरेंद्र मोदी