वेध विधानसभेचा

अविनाश कवठेकर, पुणे

लोकसभा निवडणुकीत २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपने विजय प्राप्त केला. विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील आठही जागा जिंकल्या होत्या. महानगरपालिकेत कमळ फुलले. या पाश्र्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा वर्चस्व कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान असले तरी शिवसेनेबरोबरील जागावाटप आणि इच्छुकांची वाढती संख्या यातून मार्ग काढण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुणे शहर, जिल्ह्य़ाच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली. त्यादृष्टीने पाटील यांच्याकडून शहरातील राजकारणावर घट्ट पकड जमविण्याचा  प्रयत्न सुरू झाला आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपची शहरातील ताकद वाढली आहे. त्यामुळे युती असूनही आठही विधानसभा मतदारसंघांवर भाजपकडून दावा केला जात आहे. अशा परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न भाजपला करावा लागणार आहे.

सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शत प्रतिशत भाजप असा नारा देण्यात आला होता. भाजपच्या या नाऱ्याला पुणेकरांनीही साथ देत विधानसभेच्या आठही जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून दिले. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व राखल्यानंतर शहरातील राजकारणाचा रंग बदलण्यास सुरुवात झाली. त्यापूर्वी शहराच्या काही भागातच वर्चस्व असलेल्या भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे शहराच्या सर्व भागांत विस्तारली.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील शिलेदारही भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे पक्षाची ताकदही वाढली. त्याच ताकदीच्या जोरावर महापालिका निवडणुकीत ९८ जागा मिळवत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. येत्या विधानसभा निवडणुकीतही आठही जागांवर भाजपचेच उमेदवार असावेत, अशी आग्रही अपेक्षा कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर भाजपची युती कायम राहणार असली तरी पुण्यातील आठही जागांसाठी भाजपकडे इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झाली आहे. विद्यमान सर्व आमदारांसह तब्बल ३० नगरसेवकांनी निवडणूक लढविण्याची इच्छा दर्शविली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांतील कोणत्या आमदारांची आणि नगरसेवकांची कामगिरी सरस आहे, यावरच उमेदवारीचा निर्णय होईल. मात्र युती झाली तर शिवसेनेला कोणते मतदारसंघ सोडायचे, हा कळीचा मुद्दा सध्या आहे.

सन २०१४च्या निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेनेची युती होती. युतीमधील जागावाटपानुसार कोथरूड, हडपसर, वडगावशेरी आणि पुणे कॅण्टोन्मेंट हे मतदारसंघ शिवसेनेकडे होते. तर कसबा, पर्वती, शिवाजीनगर आणि खडकवासला मतदारसंघांत भाजपकडून निवडणूक लढविण्यात आली होती. शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघांपैकी कोथरूड आणि हडपसर येथे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. मात्र २०१४च्या निवडणुकीत युती तुटल्यानंतर कोथरूड आणि हडपसर या दोन्ही जागांवर भाजपने विजय मिळवला.  आता या जागा सेनेला सोडू नयेत, अशी मागणी होत आहे.

युतीमध्ये शिवसेनेला हडपसर मतदारसंघ दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्यादृष्टीने या मतदारसंघावर दावा करण्यासाठी हडपसरमधील माजी आमदारांसह शिवसेनेच्या इच्छुक नगरसेवकांनी भाजप आमदाराची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महापालिकेत भाजपबरोबर सत्तेत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानेही शहरातील एक जागा द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यानुसार पुणे कॅणटोन्मेंट मतदारसंघावर रिपाइंकडून दावा करण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर जागावाटप करण्याचे आव्हान चंद्रकांत पाटील यांच्यापुढे आहे.

भारतीय जनता पक्षातील जागावाटपाचा तिढा असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही जागावाटपाचा घोळ सुरू आहे. आघाडीचे जागावाटप सूत्र निश्चित आहे. मात्र या वेळी काँग्रेसची ताकद घटली आहे, असा दावा करीत काँग्रेसच्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही जागावाटपाबाबत सध्या  धुसफुस सुरू आहे.

आठही मतदारसंघांत भाजपचे आमदार

’कोथरूड- भाजप

’ पर्वती- भाजप

’ शिवाजीनगर- भाजप

’ वडगांवशेरी- भाजप

’ खडकवासला- भाजप

’ हडपसर-भाजप

’कसबा- भाजप

शिवसेनेबरोबर जागावाटपाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. मात्र शहरातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकण्यासाठी पक्ष संघटना आणखी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 

– माधुरी मिसाळ, आमदार, शहराध्यक्ष, भाजप