गटबाजीमुळे काँग्रेसची स्थिती बिकट; दोन माजी मंत्र्यांचा निवडणूक लढण्यास नकार

मुंबई उपनगर : वेध विधानसभेचा

मुंबई : लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीत युती किंवा स्वतंत्रपणे लढूनही गेल्या पाच वर्षांत भाजप आणि शिवसेनेचेच वर्चस्व मुंबई उपनगरात कायम राहिले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही हेच चित्र होते. आगामी विधानसभा निवडणुकीत हे चित्र बदलण्याची शक्यता दिसत नाही. भाजप आणि शिवसेनेत कोणाच्या वाटय़ाला किती जागा येतात आणि कोणत्या जागांची अदलाबदल होते एवढाच प्रश्न आहे.

बोरिवली ते मुलुंड, गोवंडी, अणुशक्तीनगर, वांद्रे ते कुर्ला अशा पसरलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्य़ात विधानसभेचे २६ मतदारसंघ आहेत. गेल्या वेळी भाजप आणि शिवसेना वेगळे लढले होते. तेव्हा भाजपचे १२ तर शिवसेनेचे ११ आमदार निवडून आले होते. काँग्रेस दोन तर समाजवादी पक्षाचा एक आमदार निवडून आला होता. २०१७ मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीतही चित्र फारसे बदलले नव्हते. स्वतंत्रपणे लढताना उपनगरात भाजप आणि शिवसेनेतच चुरशीची लढत झाली होती. काँग्रेसची डाळ शिजू शकली नव्हती. भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही तरच चित्र काही प्रमाणात बदलू शकते. अन्यथा गत वेळेप्रमाणेच युतीचेच मुंबई उपनगरात प्राबल्य राहील हे काळ्या दगडावरील रेघ असेल.

परप्रांतीय मतदार निर्णायक

लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये १९९९, २००४ आणि २००९ मध्ये मुंबई उपनगरात काँग्रेसचे वर्चस्व होते. तेव्हा अमराठी भाषिक, अल्पसंख्याक आणि दलित मतांच्या आधारे काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. मुंबई उपनगरात उत्तर भारतीयांची मते लक्षणीय आहेत. २०१४च्या निवडणुकीपासून उत्तर भारतीय मते भाजपकडे वळली. गुजरात मतदार भाजपला पाठिंबा देतात. यातून मुंबईतील काँग्रेसचा जनाधार कमी कमी होत गेला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उपनगरात भाजप आणि शिवसेनेनेच प्राबल्य राहिले.

प्रभावी नेतृत्वाचा अभाव

युतीत काही मतदारसंघांवर दोन्ही पक्षांचा दावा आहे. जागावाटप हा भाजप आणि शिवसेनेत मुंबई उपनगरात किचकट विषय ठरणार आहे. काँग्रेस पक्ष मुंबई उपनगरात आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी झगडत आहे. नेतृत्वावरूनच मुंबई काँग्रेसमध्ये कोणाचा पायपोस कोणात राहिलेला नाही. उत्तर मुंबईतून लोकसभा लढलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी मुंबई काँग्रेसमधील वादाला कंटाळून पक्षाला रामराम ठोकला. पक्षाचा उत्तर भारतीय चेहरा कृपाशंकर सिंग यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. या साऱ्या घडामोडींमुळे मुंबईत काँग्रेसकडे प्रभारी नेतृत्वही राहिलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत २० वर्षांत बाळसे धरता आलेले नाही. सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने नवाब मलिक यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असली तरी मुंबईत राष्ट्रवादीची ताकद ही मर्यादितच आहे. एमआयएम पक्ष मुंबईत किती मते घेतो यावर काँग्रेसच्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

भाजपमध्ये चुरस

पक्षाला चांगले यश मिळण्याची शक्यता असल्याने भाजपमध्ये प्रत्येक मतदारसंघांमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासाठी बोरिवली मतदारसंघ हा सोपा आहे. मागाठणे मतदारसंघात शिवसेनेचे प्रकाश सुर्वे हे आमदार असले तरी मनसेतून भाजपवासी झालेल्या प्रवीण दरेकर यांचा या मतदारसंघावर डोळा आहे. मुलुंड मतदारसंघाचे आमदार सरदार तारासिंग यांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता कमीच आहे. या मतदारसंघात आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी, असा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आलेले किरीट सोमय्या यांचा प्रयत्न आहे. मुलाला किंवा स्वत:ही रिंगणात उतरण्याची त्यांचा प्रयत्न आहे. माजी मंत्री प्रकाश मेहता यांना घाटकोपर पूर्व मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळणार का, याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. ‘मुख्यमंत्र्यांना अवगत केले’ हा शेरा मेहता यांना महागात पडला. यात त्यांचे मंत्रिपद गेले. यातच या भागात नगरसेवकपद भूषविलेल्या प्रवीण छेडा यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यामुळे मेहता यांचा पत्ता कापला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विलेपाल्र्याचे पराग आळवणी यांना आव्हान नसेल. शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी वांद्रे पश्चिम मतदारसंघात चांगली बांधणी केली आहे.

काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले कृपाशंकर सिंग हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. त्यांना किंवा त्यांच्या मुलासाठी कलिना मतदारसंघ हवा असला तरी या मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे. हा मतदारसंघ शिवसेना सोडणार का, असा प्रश्न आहे. शिवसेनेत विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली जाईल, अशी चिन्हे आहेत. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, माजी महापौर सुनील प्रभू, संजय पोतनीस, मंगेश कुडाळकर, सुनील राऊत यांना पुन्हा उमेदवारी मिळण्यात काहीच अडचण येणार नाही. माहीम-दादर या बालेकिल्ल्यात शिवसेना सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी देणार की आदेश बांदेकर यांना रिंगणात उतरविणार याची उत्सुकता आहे.

विरोधी आमदारांचीही कसोटी

मुंबई उपनगरात अस्लम शेख (मालाड पश्चिम), नसिम खान (चांदिवली) हे दोन काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. मानखुर्द मतदारसंघाचे प्रतिनिधित्व समाजवादी पार्टीचे अबू असिम आझमी हे करतात. यापैकी शेख यांच्याबद्दल मध्यंतरी वेगवेगळ्या वावडय़ा उठत होत्या. ते काँग्रेसमध्ये कायम राहणार नाहीत, अशी चर्चा होती. मुंबई उपनगरात काही ठरावीक मतदारसंघ सोडल्यास विरोधकांचे अस्तित्वही नगण्य आहे. काही मतदारसंघांत तर लढण्यासही फार कोणी उत्सुक नाही.

माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दकी या  काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी पुन्हा निवडणूक लढविण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. सिद्दकी यांनी मुलाला उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. शेट्टी यांना विजयाची खात्री नसल्याने त्यांनी निवडणूक रिंगणातून दूर राहण्याचा निर्णय घेतला असावा. मुंबई काँग्रेसमध्ये नेहमीसारखा उत्साह दिसत नाही.