एजाज हुसेन मुजावर, सोलापूर

गेल्या पाच वर्षांत देशात बदललेल्या राजकीय स्थित्यंतराचे परिणाम सर्वत्र दिसत असताना, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर भाजपा-शिवसेनेचा वारू चौखूर उधळला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक वजनदार नेते बाहेर पडून भाजपा वा शिवसेनेत दाखल होत आहेत. या पाश्र्वभूमीवर शरद पवार यांचा सोलापूर दौरा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात तर दोन्ही काँग्रेसला लोकसभा निवडणुकांच्या अगोदरपासूनच खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. नगरचे विखे-पाटील व अकलूजचे मोहिते-पाटील या दोन्ही तालेवार घराण्यांनी भाजपशी जवळीक साधल्यानंतर पुढे दोन्ही काँग्रेसला मोठी गळतीच सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर काढलेल्या महाजनादेश यात्रेतून जवळपास हेच चित्र पाहावयास मिळाले. महाजनादेश यात्रा एखाद्या ठिकाणी गेली तर तेथे दोन्ही काँग्रेसमधून कोणते नेते फुटून भाजपामध्ये प्रवेश करणार व अशा नेत्यांना भाजपा कशा पद्धतीने ‘पावन’ करून घेणार, याचीच उत्सुकता सर्वत्र दिसत होती. त्या अनुषंगाने सोलापूर हे तर आयाराम-गयारामांसाठी एक महत्त्वाचे केंद्रबिंदूच मानले गेल्याचे घडलेल्या घडामोडींवरून दिसून आले. मुख्यमंत्र्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेची सांगता भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापुरात झाली. त्यातून ढवळून निघालेले वातावरण अजून निवळत नाही, तोच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दुभंगलेला राष्ट्रवादी पक्ष सावरण्यासाठी आणि सामान्य कायकर्त्यांमध्ये आलेली मरगळ करण्यासाठी राज्याचा दौरा सुरू केला आहे. त्याची सुरुवातही पवार यांनी याच सोलापूरपासून केली आहे.

गटबाजीने वाट बिकट

आतापर्यंत राष्ट्रवादीचा अभेद्य गड समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात या पक्षासाठी बारामतीच्या पाठोपाठ सोलापूर जिल्हा सर्वात सुरक्षित मानला जात होता. योगायोगाने शरद पवार यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा खऱ्या अर्थाने याच सोलापुरातून झाला होता. १९६५ साली पवार यांच्याकडे युवकांच्या फळीचे नेतृत्व आले, तेव्हा सोलापूरची वैयक्तिक जबाबदारी त्यांच्याकडेच देण्यात आली होती. या माध्यमातून त्यांनी सोलापुरात जिवाभावाच्या सहकारी व कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली. पवारांच्या राजकीय वाटचालीत अनेक चढउतारात सोलापूरने निष्ठेने साथ दिली आहे. परंतु आता काळाचा महिमाच असा की, याच सोलापुरात अनेक वजनदार नेत्यांनी पवारांची साथ सोडून सत्ताधारी भाजप वा शिवसेनेची वाट धरली आहे. खऱ्या अर्थाने पक्षफुटीची ही लागण मोहिते-पाटील कुटुंबीयांपासून सुरू झाली. तसे पाहता पंढरपूरचे नेते सुधाकर परिचारक व त्यांचे पुतणे आमदार प्रशांत परिचारक यांनी पाच वर्षांपूर्वीच औपचारिक स्वरूपात राष्ट्रवादीची साथ सोडली होती. परंतु तरीही परिचारक कुटुबीयांना ‘बघून घ्यावे’ असे पवार काका-पुतण्यांना कघीही वाटले नाही. उलट, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांना मदतच केल्याचे दिसून येईल. एकेकाळी सोलापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणावर पकड ठेवून असलेले मोहिते-पाटील कुटुंबीयांशी पवारांचे मतभेद झाल्यानंतर गेल्या १० वर्षांत मोहिते-पाटील यांचे पंख छाटण्याचेच काम झाले होते. त्यांना पर्याय म्हणून दुसऱ्या फळीचे सुभेदार तयार करण्यात आले.

प्रमुख नेते पक्षाबाहेर

विशेषत: २००९ सालच्या माढा लोकसभा निवडणुकीत शरद पवार हे निवडून आले, तेव्हापासून त्यांनी जिल्ह्य़ाच्या राजकारणात थेट हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. त्या वेळी परिस्थितीच अशी होती की, मोहिते-पाटील हे पवारांच्या विरोधात बंड करूच शकत नव्हते. अखेर गेल्या लोकसभा निवडणुकीत योग्य वेळ आली आणि मोहिते-पाटील कुटुंबीयांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. करमाळ्याच्या रश्मी बागल-कोलते व बार्शीचे ज्येष्ठ आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेसाठी हातात शिवबंधन बांधून घेतले. एवढेच नव्हे तर केवळ मोहिते-पाटील यांना पर्याय म्हणून ज्यांना मोठे बळ दिले, ते माढय़ाचे वजनदार साखर सम्राट, आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनीदेखील राष्ट्रवादीबरोबर असलेला घरोबा मोडीत काढण्यात जमा आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांना पवार काका-पुतण्यांनी खरोखर भरभरून दिले होते, त्या साळुखे यांनीदेखील राष्ट्रवादीतून पाय काढता घेतला आहे.

सोलापुरात शरद पवार यांनी घेतलेल्या पक्ष बैठकीकडे शिंदे बंधूंसह दीपक साळुंखे यांनी पाठ फिरविली, यातच सारे काही आले. जिल्ह्य़ात सर्वत्र राष्ट्रवादीला भगदाड पडत असताना केवळ मोहोळचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर हेच एकमेव सुभेदार पक्षात उरले आहेत. पवारांच्या बैठकीच्या वेळी राजन पाटील यांनी केलेल्या मोठय़ा शक्तिप्रदर्शनामुळे पक्षाची कशी बशी इभ्रत वाचली, असे मानले जाते.

पवारांचे जोरदार स्वागत : सोलापुरातील बैठकीत शरद पवार यांचे जंगी स्वागत करताना कार्यकर्त्यांनी दाखविलेला उत्साह पक्षासाठी खरोखर उभारी देणारा ठरणार काय, हे आगामी विधानसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. बैठकीसाठी हुतात्मा स्मृतिमंदिर कमी पडले हे खरे आहे. मात्र कार्यकर्त्यांची ही गर्दी सर्वदूरची नव्हती. माळशिरस, करमाळा, माढा, बार्शी, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला यांसारख्या शक्तिस्थळांतून आलेले कार्यकर्ते किती होते, हा संशोधनाचा विषय ठरावा. या पाश्र्वभूमीवर पवारांनी पक्षाला आलेली मरगळ झटकून कार्यकर्त्यांना नवऊर्जा देण्याचा प्रयत्न केला आहे. वयाच्या ८० व्या वर्षांतही आपण म्हातारा झालो नाही. तरुणांच्या शक्तीच्या जोरावर आपल्याला (साथ सोडून गेलेल्या) ‘लईजणांना’ बघायचे आहे, असा निर्धार बोलून दाखवितानाच, जे जे पक्ष सोडून गेले, भले ते कितीही मोठे असले तरी भविष्यात ते सारे जण इतिहासजमा होतील, अशी भविष्यवाणीही पवार यांनी केली आहे.