अमरावती : सर्व वंचित घटकांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी तयार झाली आहे. सर्वाना न्याय मिळावा, या उद्देशाने आम्ही लढत आहोत. आम्हाला फाटक्या कपडय़ांचे म्हटले जात असले, तरी याच फाटक्या माणसांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू, असा दावा वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी दर्यापूर येथे बोलताना केला.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे मातंग समाजाच्या वतीने आयोजित प्रबोधन मेळाव्यात ते बोलत होते. एमआयएम हा पक्ष वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडल्याच्या पाश्र्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी या पक्षाशिवाय इतर सहकाऱ्यांना सोबत घेऊन राजकीय वाटचाल करणार असल्याचे संकेत दिले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, या देशात अजूनही भेदभाव केला जातो. वंचित समूहाला फाटक्या कपडय़ांचे लोक म्हटले जाते. होय आम्ही फाटके आहोत. ते विसरण्याचा प्रयत्न आम्ही करीत होतो. पण, त्याची आठवण करून दिल्याबद्दल त्यांचे आभारच मानायला पाहिजेत. आता यापुढे सर्व फाटक्या लोकांनी एकत्र येऊन आपले कपडे शिवले पाहिजेत. येणाऱ्या काळात सत्तासंपादनाकडे वाटचाल करताना आपल्याला अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात काल-परवाचा न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा आहे. शिखर बँकेतील हा घोटाळा २५ हजार कोटींचा नाही, तर त्याच्याही खोल हे प्रकरण आहे. सुमारे दीड लाख कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात सरकारी तिजोरी लुटण्यात आली आहे. या प्रकरणाने भाजपच्या हाती आयतेच कोलीत दिले आहे. त्यामुळे भाजपकडे रांग लागली आहे. पण, लोक सर्वकाही ओळखून आहेत.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी त्या काळात दाखवलेले धाडस आता देखील दाखवले पाहिजे. समाजाने श्रद्धेच्या आहारी जाऊ नये, त्याच्या आहारी गेल्याने माणूस गुलाम होतो. वंचित समूहाने आता जागरूक होण्याची, एकत्र येण्याची गरज आहे.

व्यासपीठावर विदर्भ लहुजी सेनेचे संस्थापक महादेव खंडारे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विजय चोरपगार, प्रा. चरणदास निकोसे, साहेबराव वाकपांजर, नंदेश अंबाडकर, विद्यार्थी सम्यक आंदोलनचे अंकुश वाकपांजर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप एडतकर, वंचित आघाडीचे नयन मोंढे आदी उपस्थित होते.

‘आप’सोबत चर्चा

एमआयएमसोबतची युती संपुष्टात आली हे जरी खरे असले, तरी विधानसभा निवडणुकीत आम्ही किमान २५ जागांवर मुस्लीम उमेदवार उभे करणार आहोत. आम आदमी पक्षासोबत वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी प्रसार माध्यमांसोबत बोलताना सांगितले.