शहरी, ग्रामीण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

मुंबई : राज्यात वेगळी सामाजिक समीकरणे मांडून तिसरा राजकीय पर्याय म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यात दुष्काळ व शहरांतील घनकचऱ्याचा प्रश्न सोडविण्यावर भर देऊन ग्रामीण व शहरी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच मुंबईतील सभेत आघाडीचा डिजिटल जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्याच्या ओल्या भागातील धरणांतील पाणी दुष्काळी भागात घेऊन जाण्याची योजना आघाडीच्या जाहीरनाम्यात मांडण्यात आली आहे. धरणांतील पाणी, शेतीसाठी, पिण्यासाठी वापरायचे की विजेसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे, नद्या जोड कार्यक्रमाला केंद्रीय मंत्रिमंडळाने विरोध केला आहे. दुष्काळ निवारण्याबाबत भाजपकडे आराखडा नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास योजना (एसआरए) ही विकासकांची सोय आहे. झोपडी धारकांच्या पुनर्वसनाच्या नावाखाली बारा-बारा मजल्यांची खुराडी बांधली जात आहेत.  रहिवाशांना जागेचे मालक केले जात नाही. मुंबईतील मूळ वतनदार असलेल्या आगरी-कोळी समाजाच्या नावावरही त्यांच्या जागा नाहीत. वंचित आघाडीची सत्ता आल्यावर झोपडपट्टीधारकांना व आगरी, कोळी समाजाच्या नावावर जागा करण्यात येतील, असे आंबेडकर यांनी जाहीर केले.