02 June 2020

News Flash

कोल्हापुरात जनसुराज्यच्या नथीतून भाजपचा शिवसेनेवर तीर

शिवसेनेकडे कोल्हापूर जिल्ह्य़ातील १० पैकी सहा आमदारांसह आठ जागा गेल्या आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्य़ात शिवसेना- भाजपमध्ये नावच पेच निर्माण झाला असून त्याला कारण जनसुराज्य शक्ती पक्ष ठरला आहे. जिल्ह्य़ातील बहुतेक जागा शिवसेनेकडे गेल्याने भाजपचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाकडून भाजपचे उमेदवार उभे केले असल्याने शिवसेनेचा तिळपापड झाला आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जनसुराज्य शक्ती हा आता भाजपचा घटक पक्ष नसल्याचे जाहीर केल्याने शिवसेनेची अधिकच कोंडी झाली आहे.

माजी मंत्री विनय कोरे यांच्या ‘जनसुराज्य’ने स्वबळावर लढत असल्याचे सांगत आमचा कोणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेनेने मात्र भाजप- जनसुराज्यचा काडीमोड झाला असला तरी भाजपच्या उमेदवारांना रिंगणातून बाहेर काढावे अशी मागणी केली असून युतीधर्माला आतून धक्का देण्याची खेळी केल्यास त्याचे वेगळे परिणाम होतील, असा इशारा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी  सत्ताधारी घटक पक्षात एकत्र नांदणाऱ्या तिन्ही पक्षांतील प्रेमाचा त्रिकोण विधानसभेच्या राजकारणात कोणते आणि कसे वळण घेतो यावर युतीच्या निकालाची समीकरणे निश्चित होणार आहेत.

दोन्हीही खासदार असलेल्या शिवसेनेकडे कोल्हापूर जिल्ह्य़ातील १० पैकी सहा आमदारांसह आठ जागा गेल्या आहेत. स्वाभाविकच ताकद वाढलेल्या भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी फिरले. शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा वाहाण्याशिवाय पर्याय उरला नाही असे चित्र निर्माण झाले असताना गेल्या २-४ दिवसांत त्यांना संधीची आशा पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वारणा नगर येथे दिसू लागली.

विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी दाखल करण्याची शक्कल काही प्रमुखांनी लढवली आहे. यातील बहुतेक सारे उमेदवार हे मूळचे भाजपशी निगडित असून त्यांनी शिवसेनेच्याच उमेदवारांविरुद्ध अर्ज दाखल केला आहे. सेनेच्या चार मतदारसंघात जनसुराज्याचे उमेदवार उभे ठाकल्याने या मुद्दय़ावरून कोल्हापूर जिल्गल्ह्य़ात युतीत शीतयुद्ध सुरू झाले आहे.

 

युतीत तणाव

’ जनसुराज्यचे एकेकाळी चर आमदार होते. नंतर उतरती कळा लागली. निवडणूक लढवण्यासाठी पक्ष नसेल तर जनसुराज्यची उमेदवारी घेण्याची एक पद्धत राजकारणात रूढ झाली आहे.

’ यंदाही हे चित्र पुन्हा दिसत आहे. पन्हाळा मतदारसंघात स्वत: कोरे हे शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांच्या विरोधात लढत असून पाटील यांची हॅट्ट्रिक रोखण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.

’ शेजारच्या हातकणंगले या राखीव मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. येथे त्यांनी राजीव आवळे यांना निवडून आणले होते, पण सलग दोन निवडणुकीत ते पराभूत झाल्याने यंदा दोन डॉक्टरसह चार नावे डोळ्यासमोर होती.

’ ती सारी बाजूला पडून बुधवारी शिरोळ तालुक्यातील भाजपचे नेते, रात्नाप्पांना कुंभार मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष अशोक माने यांना उमेदवारी दिली असून त्यांची लढत सेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्याशी होणार आहे.

’ माने यांनी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. हातकणंगलेला लागून असलेल्या शिरोळ तालुक्यात सेनेचे आमदार उल्हास पाटील यांच्या विरोधात भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल यादव यांना जनसुराज्यने उमेदवारी दिली आहे.

’ चंदगड मतदारसंघात सेनेचे उमेदवार संग्रामसिंह कुपेकर यांना मूळचे भाजपचे आजरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांनी गुरुवारी अर्ज भरला आहे. या साऱ्या घडामोडी केवळ योगायोग असल्याचे शिवसेना मानत नाही .

’ याबाबत चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘जनसुराज्य हा महायुतीचा घटक पक्ष नाही. सध्या ते आमच्या सोबत नाहीत,’ असे स्पष्ट केले आहे. तर, शिवसेनेकडून जनसुराज्य हा भाजपाची ‘बी टीम’ असल्याचा आरोप होत आहे.

’ याबाबत शिवसेना प्रमुख यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे आमदार उल्हास पाटील यांनी सांगितले. तर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी शिवसेना उमेदवाराविरुद्ध उभे असलेले सारेच उमेदवार भाजपचे कसे? असा सवाल  केला आहे.

’ ‘भाजप – जनसुराज्यचा संबंध नसला तरी भाजपने त्यांच्या मूळच्या आणि शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना माघार घेण्यास सांगावे, अन्यथा युतीधर्म पाळताना अडचणी निर्माण होतील,’ असा इशारा ‘लोकसत्ता’शी बोलताना दिला आहे.

’ ‘जनसुराज्य पक्ष आपल्या स्वबळावर लढत आहे. चांगल्या  उमेदवारांचे स्वागत करून उमेदवारी दिली आहे. आम्हाला उत्तम प्रकारचे यश मिळेल,’ असे प्रवक्ते विजयसिंह जाधव यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 4:26 am

Web Title: maharashtra assembly elections jansurajya shakti party bjp shiv sena alliance zws 70
Next Stories
1 कोल्हापुरात ललिता पंचमी सोहळा उत्साहात
2 महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात भाविकांची गर्दी
3 कोल्हापुरात उमेदवारीवरून घराण्यांमध्ये यादवी
Just Now!
X