लोकसभेच्या तुलनेत विधानसभेसाठी कमी मतदान; शहरातील निम्मे मतदार घरातच

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या लाटेमुळे मुंबईतील मतदारांमध्ये संचारलेला उत्साह सोमवारी विधानसभेसाठी झालेल्या मतदानाच्या वेळी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. मावळलेल्या उत्साहासोबतच, शिवसेना-भाजपमधील सुंदोपसुंदी, अमराठी मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद आणि पावसामुळे चिखलमय झालेल्या मैदानांतील मतदान केंद्रांकडे मतदारांनी फिरवलेली पाठ यामुळे मुंबई आणि उपनगरांतील मतदानाचा टक्काही घसरला. मुंबई शहरात ४८.६३ टक्के, तर मुंबई उपनगरांमध्ये ५१.१७ टक्के मतदान झाले.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना आणि भाजप युती संपुष्टात आली होती. उभय पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले होते. मात्र मोदी लाटेमुळे मुंबईमधील अमराठी मतदार मोठय़ा संख्येने मतदानासाठी उतरले होते. या वेळी अगदी उलट चित्र मतदान केंद्रांवर दिसत होते. शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात परस्परांविरुद्ध खदखदणारा असंतोष, त्यातून निर्माण झालेली असहकाराची भूमिका यामुळे लोकसभेच्या वेळी असलेला उत्साह ओसरल्याचे चित्र होते.

पावसामुळे चिखलमय झालेल्या मैदानांतील मतदान केंद्रांमुळेही मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. परिणामी मतदारांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे सोमवारी सकाळपासूनच मुंबईतील मतदारसंघांमध्ये संथ गतीने मतदान सुरू होते. काही अपवाद वगळता अन्य मतदान केंद्रांमध्ये गर्दीच दिसत नव्हती.

काही ठिकाणी ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्याच्या घटनाही उघडकीस आल्या. त्यात धारावी मतदारसंघात १५, सायन कोळीवाडा मतदारसंघात चार, वडाळा मतदारसंघात १० पेक्षा जास्त, वरळी मतदारसंघामध्ये २०, शिवडी मतदारसंघात ११, कुलाबा मतदारसंघात १० पेक्षा जास्त, तर मलबार हिल मतदारसंघात पाच ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाला. मतदान यंत्रांत बिघाड झाल्याने मतदारांची गैरसोय झाली. या प्रकारांमुळे मतदारांना रांगेतउभे राहावे लागले. परिणामी काही मतदारांनी मतदान न करताच घरचा रस्ता धरणे पसंत केले. एकूणच लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीबाबत मुंबईकरांमध्ये निरुत्साह दिसून आला.

वाढवण बंदराच्या विरोधात मतदानावर बहिष्कार

पालघर: पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सरासरी ६० टक्के मतदान झाले.  नालासोपारा व बोईसर मतदारसंघांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.  प्रस्तावित वाढवण बंदराच्या विरोधात तसेच केळवे रोड येथे उड्डाणपूल व्हावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी उस्फुर्त टाकलेल्या बहिष्कारामुळे काही शून्य टक्कय़ाच्या मतदान केंद्रांसह 34 मतदान केंद्रांवर पाच टक्कय़ांपेक्षा कमी मतदान नोंदवण्यात आले.

ठाणे जिल्ह्य़ात ५० टक्के मतदान

ठाणे जिल्ह्य़ातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये सरासरी ५० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले आहे. कमी मतदान उल्हासनगर मतदारसंघामध्ये तर सर्वाधिक मतदान शहापूर ग्रामीण मतदारसंघात झाले आहे. जिल्ह्य़ात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले असले तरी ठाणे शहर मतदारसंघामध्ये ईव्हीएम यंत्रावर शाई फेकण्याचा प्रकार घडल्यामुळे निवडणुकीला गालबोट लागले. ठाणे मतदारसंघातील जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळील मतदान केंद्रातील ईव्हीएम यंत्रावर बसपचे पदाधिकारी सुनील खांबे यांनी शाई फेकली. या यंत्राचा निषेध करण्यासाठी त्यांनी हा प्रकार केला असून याप्रकरणी ठाणेनगर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

रायगडमध्ये ६५.९० टक्के मतदान

अलिबाग : रायगड जिल्ह्य़ात किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. जिल्ह्य़ात ६५.९० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.   सकाळी मतदान अतिशय संथ गतीने सुरू होते. ९ वाजेपर्यंत अवघे ६.५० टक्के इतकेच मतदान झाले होते. नंतर हळूहळू मतदानाचा वेग वाढत गेला.    उरण मतदारसंघात सर्वाधिक ७३ टक्के तर पनवेलमध्ये सर्वात कमी ५६ टक्के मतदानाची नोंद झाली.