01 June 2020

News Flash

प्रचार हंगाम आटोपला

मुंबई, पुण्यासारख्या शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागांत निवडणुकीचा प्रचार अधिक चुरशीचा आणि रंगतदार झाला.

(संग्रहित छायाचित्र)

सांगता सरत्या पावसात चिंब, आता मतदारांची मनधरणी

आरोप-प्रत्यारोप, आव्हाने-प्रतिआव्हाने, टोले-प्रतिटोले, वचने-आश्वासने, आम्ही हे केले आणि ते करू अशा हिंदोळ्यांवर झुलणारा विधानसभा निवडणुकीचा प्रचार हंगाम शनिवारी संध्याकाळी ओटोपला, परंतु या प्रचार हंगामाला सरत्या पावसाने चिंब केले आणि आपला हंगाम मात्र अजूनही सुरू असल्याचे दाखवले.

गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेली जाहीर प्रचाराची रणधुमाळी संपल्याने उमेदवारांनी आता समाज माध्यमांद्वारे आणि वैयक्तिक संपर्कातून मतदारांची मनधरणी सुरू केली आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळला. त्याचा परिणाम जाहीर सभा आणि प्रचारफेऱ्यांवर झाला. अमित शहा, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्या काही सभा रद्द कराव्या लागल्या. बहुतेक उमेदवारांनी प्रचारफेऱ्या काढून मतदारांशी संपर्क साधला. यावेळी राज्यात ३२३७ उमेदवार रिंगणात आहेत.

भाजप-शिवसेना सत्ताधारी युतीला ही निवडणूक आधी सोपी वाटत होती. परंतु या दोन्ही मित्र पक्षांमध्ये बंडखोरांचे अमाप पीक आल्याने आणि काही ठिकाणी त्यांचेच उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने दोन्ही पक्षांचे नेते काहीसे चिंताग्रस्त झाले. नंतर काँग्रेसच्या वतीने फारसे कोणी प्रचार मैदानात न उतरल्याने युतीला दिलासा मिळाला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी युतीला एकहाती आव्हान दिले. परिणामी, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील लढतींमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातील आव्हान-प्रतिआव्हाने, टोले-प्रतिटोले यामुळे दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला. शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीने त्यांचे चिरंजीव युवानेते आदित्य ठाकरे यांनी अनेक मतदारसंघांत स्वतंत्र सभा घेतल्या. या चारही नेत्यांनी आपल्या उमेदवारांसाठी रोज चार ते पाच सभा घेत महाराष्ट्र पिंजून काढला. मुंबई, पुण्यासारख्या शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागांत निवडणुकीचा प्रचार अधिक चुरशीचा आणि रंगतदार झाला.

प्रचारासाठी शनिवार हा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत:च्या मतदारसंघात ‘रोड शो’ केला. याशिवाय भंडारा, चिमूर, सावली येथे सभा घेतल्या आणि महायुतीला दोनतृतीयांश बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

शरद पवार यांनी कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार यांच्यासाठी, बारामतीमध्ये अजित पवारांसाठी सभा घेतली. कितीही खटले दाखल करा, त्याला घाबरणार नाही. हा बारामतीकर या खटल्यांना पुरून उरल्याशिवाय राहणार नाही, असा हल्ला पवार यांनी चढवला. परळीमध्ये प्रचारसभा सुरू असतानाच भाजपनेत्या पंकजा मुंडे यांना भोवळ आली, तर पावसाने अमित शहा यांचे हेलिकॉप्टर नाशिकमध्ये उतरवावे लागले.

प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्व २८८ मतदारसंघांत सर्वपक्षीय उमेदवारांनी सभा, प्रचार फेऱ्या, मोटारसायकल फेऱ्या यांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधला. मुंबईत वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी आणि वांद्रे येथे आशीष शेलार यांनी, कुलाबामध्ये काँग्रेसचे भाई जगताप यांनी भरपावसात प्रचारफेरी काढली. तर ठाण्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली.

अशी रंगत..

देवेंद्र फडणवीस, शरद पवार, राज ठाकरे, अजित पवार यांच्या काही विधानांनी वाद निर्माण केले, तर काही विधानांनी प्रचाराची रंगत वाढवली. कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांचे पार्सल घरी पाठवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. त्याचबरोबर शरद पवार यांची अवस्था ‘अर्धे इकडे जा, अर्धे तिकडे जा आणि उरलेले माझ्यासोबत या’ अशी झाल्याची खिल्लीही फडणवीस यांनी उडवली. आम्ही मैदानात शड्डू ठोकून उभे आहोत, पण समोर पैलवानच नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांना आव्हान दिले. त्यावर लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही असे प्रत्युत्तर देत पवारांनी विशिष्ट हातवारे करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यावर, आम्हाला ‘नटरंग’सारखे हातवारे करता येत नाहीत, असा पलटवार फडणवीस यांनी केला. आदिवासींचा विकास करण्यासाठी गेलो असे ते सांगतात. मग ४० वर्षे काय गवत उपटत होतात काय?, अशी टीका पवार यांनी मधुकर पिचड यांचे नाव न घेता केली.

सलग सुटीमुळे धाकधूक

* विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी, २१ ऑक्टोबरला मतदान होत असल्याने त्या दिवशी सुटी आहे.

* रविवार आणि सोमवार असे सलग दोन दिवस सुटी असल्याने मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

* प्रामुख्याने मध्यमवर्गीय मतदार अशा सलग सुटय़ांमध्ये फिरण्यास जातात, असा अनुभव आहे.

* हा वर्ग बहुतांश भाजपचा मतदार असल्याने मतदानाच्या प्रमाणाविषयी भाजपच्या नेत्यांना धाकधूक आहे.

* खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे आणि नंतर मुंबई येथे बाहेर न जाता मतदान करण्याचे आवाहन केले होते.

हाणामारीचे गालबोट : निवडणुकीच्या संघर्षांत विदर्भातील साकोलीमध्ये काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले आणि राज्यमंत्री असलेले भाजपचे उमेदवार परिणय फुके यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली. तर मुंबईत ६० किलो सोने आणि ५८ किलो चांदी जप्त करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2019 1:09 am

Web Title: maharashtra assemblys election campaign stopped abn 97
Next Stories
1 दिवाळी अंकांना निवडणुकीची झळ
2 ‘लोकसत्ता’ दुर्गा सन्मान सोहळा मंगळवारी
3 मुख्यमंत्र्यांकडून अधिक जबाबदार वक्तव्याची अपेक्षा!
Just Now!
X