महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं वातावरण आता तापायला लागलं आहे. दर दिवसाला रंगणाऱ्या प्रचारात राजकीय पक्ष आपल्या विरोधकांवर टीकेची झोड उठवत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक आमदरांना यंदा शिवसेना-भाजपाने आपल्या पक्षात दाखल करुन घेतलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही संधी साधत राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्वतःची छबी लोकांमध्ये तयार करण्याचं काम सुरु केलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे सांताक्रुझ येथे झालेल्या सभेत, मला सत्तेत रस नाही पण तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मला विरोधी पक्षात काम करण्याची संधी द्या अशी मागणी केली.

मनसेच्या या मागणीवर भाजपाने आपल्या सोशल मीडियातील ‘रम्याचे डोस’ या मालिकेतून प्रहार केला आहे. व्हिडीओ पहायला येणारी गर्दी आणि प्रत्यक्षात मिळणारी मतं यातला फरक राज ठाकरेंसाठी अनाकलनीय होता, मात्र आता तो त्यांना समजला असेल, अशा शब्दांत भाजपाने मनसेला टीकेचं लक्ष्य केलं आहे.

आणखी वाचा- अनाकलनीय! ‘हे’ तर विनोदी पक्ष नेते; भाजपाचा राज ठाकरेंवर निशाणा

सत्ताधारी पक्षाचे आमदार तुमचे प्रश्न विधानसभेत मांडणार नाहीत, मात्र गेल्या काही वर्षांत युती सरकारने राज्यात जो गोंधळ घालून ठेवलाय याबद्दल जाब विचारण्यासाठी मनसेच्या उमेदवारांना विरोधी पक्षात काम करण्याची संधी द्या अशी मागणी सध्या मनसे प्रमुख राज ठाकरे करत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या या सुंदोपसुंदीत कोणता पक्ष बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.