कन्नड मतदारसंघात भाजपचे मंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार यांनी शिवसेना उमेदवार उदयसिंह राजपूत यांच्या विरोधात बंडखोरी केली. कन्नडचे माजी आमदार आणि रावसाहेब दानवे यांचे जावाई हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात उदयसिंह राजपूत अशी लढत होईल, असे चित्र होते, मात्र, किशोर पवार यांच्यामुळे येथे तिरंगी लढत होत आहे.

कन्नडमधून आठ उमेदवार रिंगणात आहेत. दानवे यांचे जावाई जाधव व लोणीकरांचे जावई पवार यांच्यात चुरस पाहावयास मिळले. विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, सोमवारीच किशोर पवार यांनी पिशोर नाका येथील जैन कॉप्लेक्समध्ये मेळावा घेऊन निवडणूकीत आव्हान कायम ठेवले.

भाजपाचे डॉ. संजय गव्हाणे व जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. डॉ. गव्हाणे यांनी युतीधर्माचे पालन करत अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज माघे घेतला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला मतदारसंघातून ४१ हजारांपेक्षा जास्त मते मिळाल्याचे सांगत पवार यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे.

कन्नड विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दोनवेळा निवडणूक जिंकली आहे. पहिल्यांदा मनसे, तर दुसऱ्यावेळी शिवसेनेकडून विधानसभेत जाधव यांनी प्रवेश केला होता. पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा देत मागील लोकसभा निवडणूक लढविली. जाधव यांनी केलेल्या मतविभाजनामुळे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे पराभूत झाल्याचे मानले जातेय.