महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराला राज ठाकरे यांच्या सभेने प्रारंभ होणार असून बुधवारी (९ ऑक्टोबर) राज ठाकरे यांची सरस्वती मंदिर मैदानात संध्याकाळी सहा वाजता सभा होणार आहे. या ‘राज’गर्जनेच्या माध्यमातून मनसे पुण्यातील विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. राज यांच्या सभेच्या निमित्ताने निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा निवडणुकीसाठी मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाकडून १ ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाला पत्र देण्यात आले होते. टिळक रस्ता आणि शनिवार पेठेतील रमणबाग शाळेतील मैदान सभेसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. मात्र सभेला परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर बुधवारी (९ ऑक्टोबर) सरस्वती विद्या मंदिरच्या मैदानासाठी मनसेकडून अर्ज करण्यात आला. मात्र मैदान उपलब्ध करून देणे अडचणीचे असल्याचे सांगण्यात आले.

निवडणूक शाखेकडे मनसेकडून पुन्हा पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर सरस्वती मंदिरचे मैदान मनसेला उपलब्ध झाले आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळी सहा वाजता राज ठाकरे यांची पुण्यातील उमेदवारांसाठीची सभा होईल. या सभेच्या निमित्ताने मनसेच्या प्रचारालाही सुरुवात होणार आहे.

मनसेने कोथरुडमधून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात उमेदवार मैदानात किशोर शिंदे यांना उतरवले आहे. कोथरूडमध्ये मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पाठिेंबा जाहीर केला आहे. चंद्रकांत पाटलांना घेरण्यासाठी आघाडीनं व्यूहरचना केल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची वाट खडतर होणार आहे. अशातच राज यांची सभा पुण्यात होणार असल्याचे त्याचा पक्षाच्या उमेदावारांना फायदा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकींच्या वेळी प्रत्यक्ष निवडणुकींमध्ये न लढता राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात प्रचार केला होता. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये त्यांनी डिजीटल माध्यमांची आणि प्रेझंटेशनची मदत घेत सभा घेऊन सरकारच्या दाव्यांची पोलखोल केली होती. मात्र राज यांच्या या भाजपाविरोधी प्रचाराचा फारसा फरक पडल्याचे निवडणुकीच्या निकालांमध्ये दिसले नाही. त्यामुळे यंदा विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होणार की मनसे फॅक्टर या निवडणुकीमध्ये कमाल करणार याबद्दल राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु आहेत.

More Stories onमनसेMNS
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra election 2019 raj thackeray mns pune rally on 9th oct nck
First published on: 08-10-2019 at 08:01 IST