मुंबई : युतीच्या जागावाटपात मतदारसंघ मित्रपक्षाला सुटल्याने किंवा आपल्याच पक्षाने उमेदवारीत डावलल्याने बंडखोरी केलेल्या उमेदवारांमुळे राज्यात विविध ठिकाणी भाजप-शिवसेनेला चांगलाच फटका बसला आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ पासून ते भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे उमेदवार असलेल्या मुक्ताईनगपर्यंतच्या मतदारसंघांचा समावेश आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बंडखोरीमुळे काही प्रमाणात फटका बसल्याची कबुली दिली.

उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री वांद्रे पूर्व मतदारसंघात असून शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली. त्याचा फटका सेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांना बसला व कॉंग्रेसचे झिशान सिद्दिकी निवडून आले. करमाळ्यातही शिवसेनेने विद्यमान आमदार नारायण पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली. त्यामुळे राष्ट्रवादीतून सेनेत आलेल्या रश्मी बागल यांना राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे या मुक्ताईनगरमधून उमेदवार होत्या. पण सेनेचे चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी केली. त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. त्यामुळे रोहिणी खडसे यांचा पराभव झाला.

रावेरमध्ये भाजपचे बंडखोर अनिल चौधरी यांच्यामुळे पक्षाचे अधिकृत उमेदवार हरिभाऊ जावळे हे शिरीष चौधरी यांच्याकडून पराभूत झाले. मिरा-भाईंदरमध्ये भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात पक्षाच्या स्थानिक नेत्या गीता जैन यांनी बंडखोरी केली आणि विजयही मिळवला.

देवळी मतदारसंघ सेनेला सोडल्याने भाजपचे राजेश बकाने यांनी केलेल्या बंडखोरीमुळे कॉंग्रेसचे रणजित कांबळे निवडून आले. तुमसरमध्ये भाजपचे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांनी बंडखोरी केल्याने भाजपचे उमेदवार प्रदीप पडोळे यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे राजू कारेमुरे निवडून आले.

कागलमध्ये शिवसेनेला जागा सुटल्याने भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी बंडखोरी केली. याचा फायदा घेत सेनेच्या संजय घाटगेंचा पराभव करून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ जिंकून आले. चंदगडमध्येही सेनेचे संग्राम कुपेकर यांना भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील यांच्यामुळे राष्ट्रवादीचे राजेश पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.