30 September 2020

News Flash

पश्चिम वऱ्हाडात प्राबल्य राखताना महायुतीची दमछाक

राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल दिला.

(संग्रहित छायाचित्र)

काँग्रेस, वंचितला फटका तर राष्ट्रवादी, शिवसेनेला फायदा

प्रबोध देशपांडे, अकोला

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीची राज्यात पिछेहाट झाली. गड समजल्या जाणाऱ्या विदर्भातही भाजपला मोठा फटका बसला. पश्चिम वऱ्हाडात मात्र प्राबल्य राखण्यात महायुतीला यश आले. त्यासाठी भाजपची चांगलीच दमछाक झाल्याचे चित्र आहे. भाजपने पूर्वीप्रमाणे नऊ मतदारसंघात विजय मिळवला असून, शिवसेनेच्या पारडय़ात एक जागा वाढून तीन जागांवर भगवा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादीने खाते उघडले, तर काँग्रेसची एक जागा कमी झाली. वंचित आघाडीला एकमेव जागा गमवावी लागली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल दिला. मात्र, कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीलाही बळ पुरवत सक्षम विरोधक मतदारांनी दिले आहेत. सध्या सत्तास्थापनेचे समीकरण जुळवली जात आहेत. विभागनिहाय ‘काय गमावले, काय प्राप्त केले’ याची गणित मांडली जात आहेत. पश्चिम वऱ्हाडातील १५ जागांवर २०१४ मध्ये भाजप नऊ, काँग्रेस तीन, शिवसेना दोन व वंचित आघाडीकडे एक जागा होती. आताही भाजपकडे नऊ जागा कायम असून, शिवसेना तीन, काँग्रेस दोन व राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला. अकोला जिल्हय़ात महायुतीला शतप्रतिशत यश मिळाले. भाजपकडे असलेला अकोला पूर्व वगळता अकोला पश्चिम, मूर्तिजापूर व अकोटची जागा कायम राखण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. अगदी सहज विजय मिळेल, असे गृहीत धरणाऱ्या भाजपला विजयासाठी मतदारांनी चांगलेच झुलवले. अकोला पश्चिममध्ये काँग्रेसने, तर अकोट व मूर्तिजापूरमध्ये वंचित आघाडीने भाजपला जोरदार लढत दिली. शेवटच्या काही फेऱ्यामध्ये भाजपच्या बाजूने पारडे झुकले. त्यामुळे भाजप उमेदवारांचा अल्प मताने विजय झाला. भाजपसाठी मतदारांचा हा सूचक इशारा ठरला आहे. बालेकिल्लात वंचित आघाडीला एकमेव जागाही कायम राखता आली नाही. बाळापूरमध्ये वंचितने डॉ.धर्यवर्धन पुंडकर यांच्या रुपात नवीन उमेदवार दिला. बाळापूरच्या किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवण्यात शिवसेनेला यश आले. अकोला जिल्हय़ातील सर्व जागा महायुतीला मिळाल्या असल्या तरी त्यासाठी कराव्या लागलेल्या कसरतीवरून भाजप नेत्यांना शिकवणही मिळाली आहे.

बुलढाणा जिल्हय़ात गेल्या निवडणुकीप्रमाणे मतदारांनी सर्व पक्षांचे प्रतिनिधी जिल्हय़ातून विधानसभेत पाठवले आहेत. जिल्हय़ात काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला. बुलढाणा व चिखलीच्या जागेवर काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला तर, भाजपच्या मलकापूरच्या गडाला काँग्रेसने सुरुंग लावत एक जागा मिळवली. मलकापूरमध्ये काँग्रेसचे राजेश एकडे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते चैनसुख संचेती यांचा पराभव करत प्रथमच विधानसभा गाठली. मलकापूरमध्ये पराभव झाला असला तरी भाजपने जिल्हय़ात तीन जागा कायम राखल्या आहेत. जळगाव जामोद, खामगाव मतदारसंघ विजयी परंपरा कायम राखत चिखलीचा बालेकिल्ला पुन्हा एकदा प्राप्त केला आहे. शिवसेनेचा सिंदखेड राजामध्ये पराभव झाला असला तरी प्रतिष्ठेच्या बुलढाण्याच्या जागेवर भगवा फडकला. त्यामुळे जिल्हय़ात शिवसेनेच्या दोन जागा कायम आहेत. सिंदखेड राजामध्ये विजय मिळवत राष्ट्रवादीने जिल्हय़ात पुन्हा एकदा खाते उघडले आहे.

वाशीम जिल्हय़ात प्रस्थापितांना जागा कायम राखण्यात यश आले. दोन जागांवर कमळ, तर रिसोड मतदारसंघात पंजाला मतदारांनी कौल दिला. वाशीम व कारंजामध्ये मतविभाजनाचा भाजपला फायदा झाला. रिसोडमध्ये अनंतराव देशमुखांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसचे अमित झनक यांना चांगलाच संघर्ष करावा लागला. अखेर झनक यांनी विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. महायुतीमध्ये रिसोड शिवसेनेसाठी सोडण्यात आला. मात्र, त्याठिकाणी शिवसेनेचा प्रभाव दिसून आला नाही.

२३ हजार मतदारांकडून ‘नोटा’

पश्चिम वऱ्हाडातील १५ मतदारसंघात २३ हजार मतदारांकडून नोटा पर्यायाचा वापर करण्यात आला. यापैकी कुठलाही उमेदवार नको म्हणून मतदारारांनी सर्वपक्षीय उमेदवारांना नाकारले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 4:12 am

Web Title: maharashtra election result 2019 bjp suffered a huge loss in vidarbha zws 70
Next Stories
1 रवि राणांच्या बिनशर्त पाठिंब्याने काँग्रेसजण अचंबित!
2 परवाना वर्षभरापेक्षा अधिक कालबाह्य़ राहिल्यास पुन्हा ‘लर्निग’ आवश्यक
3 ध्वनी प्रदूषणाचा पक्ष्यांवर दुष्परिणाम
Just Now!
X