‘मी पुन्हा येईन’पासून, ‘खड्डय़ानंच मारू’ पर्यंतच्या भाष्यांचा पाऊस

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे काहीसे अनपेक्षित निकाल जाहीर होऊ लागताच मिम्स, गाणी, चित्रफिती, विनोद, चुटकुले इत्यादी मजकुराचा पाऊस समाजमाध्यमांवर पडू लागला. उदयनराजे भोसले, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पंकजा मुंडे यांचा पराभव, बिचुकलेला मिळालेली मते, फडणवीसांचे ‘मी पुन्हा येईन’, हे गाजलेले वक्तव्य यांचा कौशल्यपूर्वक वापर करत समाजमाध्यमवीरांनी निकाल चांगलाच चर्चेत आणला.

मुंबईचे महापौर महाडेश्वर यांचा वांद्रे येथून दारुण पराभव झाला. त्यावर ‘मुंबई तुंबली वांद्रय़ात’, ‘महापौरांना घरचा आहेर’, ‘मातोश्रीच्या अंगणात सेनेचा पराभव’ अशा शब्दांत समाजमाध्यमवीर व्यक्त झाले. कर्जत-जामखेडमधून रोहित पवार मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले. यावर ‘चुका मुकातून सावरले, रोहित पवार निवडून आले’, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त झाली.

साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांच्या निकालावर सर्वाधिक चर्चा सुरू होती. ‘नुसती फुटकळ शक्तिप्रदर्शनेही ८१००० मतांनी पिछाडीवर नेतात’, ‘मालक ८१ हजारांनी पिछाडीवर’ अशा शब्दांत तरुणांनी त्यांची खिल्ली उडवली. त्याचबरोबर ‘आम्ही चरबी आणि माज दोन्हीही उतरवतो – समस्त कोल्हापूरकर’, ‘सीएम फडणवीस निवडणुकीपूर्वी- बंडखोरांना जागा दाखवणार, निवडणुकीनंतर – १५ बंडखोर आमच्या संपर्कात’, ‘भिवंडी वोटर्स.. बी लाइक.. खड्डय़ानंच मारू’ या विनोद आणि ‘मिम्स’ना समाजमाध्यमांवर उधाण आले होते.

‘मतदान झाल्यावर भाजपचे समर्थक मतदानाची आतुरतेने वाट बघताना..’ या आशयाच्या मिम्सला नेटकऱ्यांची पसंती मिळत होती. उमेदवारांच्या विजयाची घोषणा  होण्याआधी त्यांच्या हरलेल्या आणि विजयाच्या संदेशांनी समाजमाध्यमे वाहत होती. वरळीमधून ‘बिग बॉस’फेम अभिजीत बिचुकले यांना काही फेऱ्यानंतर भोपळाही फोडता आला नव्हता. त्यांना ७७६ मते मिळाल्यावर एवढी तरी मते कोणी दिली, असा सवाल तरुणांनी समाजमाध्यमावर विचारला.

ऑनलाइन मतचाचणी

युतीला सर्वाधिक जागा मिळाल्यावर विविध संकेतस्थळांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणाचा असेल, असा प्रश्न विचारून मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना भाजपचा मुख्यमंत्री होईल, असे वाटते, तर ३० टक्के लोकांचे मत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असे होते. यंदा #मतदाननिकाल २०१९, # जितेगाभाईबीजेपीही जितेगा, #महाराष्ट्र असेंब्ली पोल्स हे हॅशटॅग समाजमाध्यमावर सर्वात जास्त वापरले गेले.