मधु कांबळे, मुंबई

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पार खचून गेलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत चांगली उभारी आली आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राग व्यक्त करण्यासाठी मतदारांनीच काँग्रेसला हात दिला. राज्याच्या राजकारणात पहिल्या स्थानावर राहिलेल्या काँग्रेसला आता चौथ्या स्थानावर जावे लागले. मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढे जाणे हेही काँग्रेसपुढे भविष्यातील आव्हान राहणार आहे.

पंधरा वर्षे सत्ता भोगणारा काँग्रेस २०१४ च्या एका पराभवानेच गलितगात्र झाला. भाजप-शिवसेनेच्या सत्ताकाळातील पाच वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही पक्षाची सुमार कामगिरीच राहिली. सत्ता गेल्यानंतर मुख्यमंत्रिपद, मंत्रिपदे उपभोगलेले नेतेही हातबल झाले होते. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाने पक्षाचे जे काही नेते आहेत, तेच पुरते खचून गेले. पक्षाची धुरा सांभाळायला धाडसाने कुणी पुढे येईना. अशा परिस्थिीत बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र आपण स्वत: तरी निवडून येऊ की नाही, याचीच सगळ्याच नेत्यांना धाकधूक होती. त्यामुळे आपापला मतदारसंघ किंवा फार तर जिल्हा या पलीकडे नेतेही जाऊ शकले नाहीत. केंद्रीय नेतृत्वानेही महाराष्ट्रसारख्या महत्त्वाच्या राज्याकडे जवळपास दुर्लक्षच केले. राहुल गांधी यांचा दोन दिवसांचा दौरा आणि पाच सभा झाल्या. भाजप नेतृत्वाच्या तुलनेत ते नगण्यच होते. मतविभाजन टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर केलेली आघाडी ही काँग्रेसची जमेची बाजू ठरली.

दोन जागा वाढल्या

शेतकऱ्यांचे प्रश्न व वाढती बेरोजगारी यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनमत तयार होत होते. त्याचा काही प्रमाणात काँग्रेसला फायदा झाला. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ९४ लाख ९६ हजार ९५ म्हणजे १८ टक्के मते मिळाली होती व ४२ जागा मिळाल्या होत्या. या वेळी काँग्रेसच्या दोन जागा वाढल्या म्हणजे ४२ च्या ४४ जागा झाल्या तरी एकूण मतांमध्ये घट झालेली आहे. या वेळी काँग्रेसला ८७ लाख ४८३ मते म्हणजे १५.१७ टक्के मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसची एकूण मते आणि जागाही वाढलेल्या आहेत. मुंबईत काँग्रेसला कशाबशा चार जागा मिळाल्या. काही अपवाद वगळला तर शहरी भागात काँग्रेसची पीछेहाट होताना दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही ते मान्य केले.

दलित, अल्पसंख्याकांनी दिले बळ

दलित, अल्पसंख्याक हा वर्ग पुन्हा काँग्रेसकडे वळतो आहे. या निवडणुकीत त्याचा फायदा काँग्रेसला झाला आहे. या निवडणुकीने काँग्रेसला तारले असे म्हणता येईल. परंतु पुढील काळात भाजप-शिवसेनेबरोबरच्या राजकीय लढाईसोबतच, आघाडीच्या राजकारणात पुन्हा पहिल्या स्थानावर येण्यासाठी राष्ट्रवादीने उभ्या केलेल्या आव्हानाचाही काँग्रेसला सामना करावा लागणार आहे.