उभयतांमधील कुरघोडीच्या राजकारणाला ऊत 

दयानंद लिपारे, कोल्हापूर</strong>

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची मुद्रा अधिक ठळक करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या दोन दिवसांच्या दौऱ्याच्या माध्यमातून केला. कोल्हापूर जिल्ह्य़ात जागावाटपात शिवसेनेचे पारडे जड असले तरी म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांना कागल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जवळपास घोषित केल्याने सेनेतून लगेचच मतदारसंघावर हक्क सांगितला गेला. भाजपच्या वाढलेल्या राजकीय ताकदीच्या प्रमाणात जिल्ह्य़ात समान जागावाटप व्हावे, असा आग्रह दुसऱ्या फळीतील प्रमुखांनी धरला आहे. त्यावर ठोस भाष्य झाले नसल्याने त्यांच्या अपेक्षा अधांतरी राहिल्या आहेत. भाजपमध्ये एकजूट दिसत असताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांची अनुपस्थिती ठळकपणे नजरेत भरणारी होती. भाजपमध्ये गेलेले माजी खासदार धनंजय महाडिक यांचा प्रवेश त्यांना रुचला नसल्याचे सांगितले जाते. पोस्टरबाजीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला.

यंदा ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी आणि महापुराच्या आपत्तीने कोल्हापूर जिल्ह्य़ाची अपरिमित हानी झाली. महापुराच्या तडाख्याने कोल्हापूर-सांगली जिल्ह्य़ाची होरपळ होत असताना मुख्यमंत्री फडणवीस हे दहा दिवसांनंतर या भागात आले. कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी केल्यावर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना मदतीचे आश्वासन दिले. मात्र हा दौरा घाईघाईचा झाला आणि महापुराच्या नुकसानीच्या प्रमाणात त्यांनी भरीव काही केले नाही, अशी टीका विरोधकांनी केली. आता या यात्रेच्या निमित्ताने महापुराचा दणका बसलेल्या भागात आल्यावर फडणवीस यांनी महापुराच्या बाबतीतही दीर्घकालीन आणि शाश्वत स्वरूपाच्या उपाययोजना करण्याचा संकल्प केला. त्यासाठी जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या संस्थांच्या माध्यमातून – सहकार्यातून हे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जागतिक बँक व आशियाई डेव्हलपमेंट बँक यांच्या सहकार्याने पूरस्थितीवर शाश्वत उपाययोजना केली जाणार आहे. त्यामुळे महापूर असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवले जाईल आणि महापुराचा कसल्याही प्रकारचा फटका बसणार नाही. अतिवृष्टी – महापुराचे थैमान सुरू राहिले तरी वीज, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा अव्याहतपणे कार्यरत राहणारे नियोजन केले जाणार आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी संभाव्य नियोजनाची रूपरेषा स्पष्ट केली. त्यांनी महापूरस्थितीवर कायमस्वरूपी आणि शाश्वत प्रकारची उपाय योजना केली जाणार असल्याचे त्यांनी आश्वस्त केले आहे. या कामासाठी ५ ते ६ वर्षांचा अवधी असल्याने तोवर या कामांची पूर्तता होण्याची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागणार आहे. या मांडणीतून त्यांनी शासन महापूरप्रश्नी गांभीर्यपूर्वक पावले टाकत असल्याचा दिलासा दिला.

 

शिवसेनेशी खडाखडी : यात्रा काळात फडणवीस यांनी सुरेश हाळवणकर आणि अमल महाडिक या भाजपच्या आमदारांच्या कार्याचे कौतुक केले. राधानगरी ही चंद्रकांत पाटील यांची जन्मभूमी. येथे पोहोचल्यावर त्यांनी दादांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरचा अभूतपूर्व विकास झाल्याचे सांगत त्यांची प्रशंसा केली. याचवेळी नव्या आमदारांची पेरणी त्यांनी केली. बिद्री (ता. कागल) येथे जनसमुदायासमोर बोलताना राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वारसदार, म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांची उमेदवारी जाहीर करून कागलची जागा भाजपला मिळणार असल्याचे संकेत दिले. ‘आमदारांना (माजी मंत्री हसन मुश्रीफ) गेल्या १५ वर्षांत सत्ता असतानाही जे जमले नाही ते समरजीत घाटगे यांनी आमदार नसतानाही करून दाखवले आहे. समरजीतना एकदा संधी द्या, कागलचा उर्वरित विकास करण्याचा आपण शब्द देतो, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री भाजपचे संभाव्य उमेदवार घाटगे यांना दिलासा देत होते तेव्हाच तिकडे कागल तालुक्यात शिवसेना युतीच्या जागावाटपातील कागलचा गड सोडणार नाही अशी भाषा करीत होती. माजी आमदार संजय घाटगे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळवून देण्याचा शब्द खासदार संजय मंडलिक हे देत होते. भाजपने आणि त्यातही थेट मुख्यमंत्र्यांनी सेनेच्या कागल मदारसंघावर हक्क सांगितल्याने शिवसेनेत नाही म्हटले तरी अस्वस्थतेचे वारे वाहू लागले असून आता त्यांच्या साऱ्या अपेक्षा मातोश्रीच्या आदेशावर अवलंबून आहेत.

संभाजीराजेंची पाठ आणि राष्ट्रवादीची पोस्टरबाजी

मुख्यमंत्री दोन दिवस कोल्हापुरात असतानाही खासदार संभाजीराजे यांनी यात्रेकडे पाठ फिरवली. यात्रेचे नियोजन राष्ट्रवादीला सोडचिट्ठी दिलेले धनंजय महाडिक यांच्या हाती होते. माजी खासदार स्वत: जागोजागी निवेदन करताना दिसत होते. मागील लोकसभा निवडणुकीत महाडिक गटामुळे पराभव झाल्याचे शल्य राजघराण्यात आहे. त्यातून संभाजीराजे यांनी महाडिक यांचा समावेश असलेल्या यात्रेकडे जाण्याचे टाळले असल्याची चर्चा आहे. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून फडणवीस यांनी विरोधकांवर कडाडून हल्ला चढवण्यास सुरुवात केली असताना कोल्हापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने गनिमी कावा करीत मुख्यमंत्री आणि जनादेश यात्रेवर पोस्टरबाजीतून निशाणा साधला आहे. प्रमुख चौकात राष्ट्रवादीने रातोरात फडणवीस यांच्या विरोधात फलक उभारले आहेत. कांदा आयात, गडकोट किल्ले, शेतकऱ्यांची कर्जमाफी, कडकनाथ घोटाळा, वाचाळवीर भाजपनेते याबाबत खिल्ली उडवणारा मजकूर प्रसिद्ध केला होता. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ‘मी परत येतोय’ हे घोषवाक्य घेऊन सुरू आहे. त्याला टोला मारत ‘मी पस्तावतोय’ असा उल्लेख या फलकावर करण्यात आला आहे. कोल्हापुरात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असे पोस्टरयुद्ध यात्राकाळात पाहायला मिळाले.