महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणापासून ते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यापर्यंत अनेक लोकनेत्यांनी जनतेच्या मनात घर केलं. आपल्या कामातून राजकीय मैदान दणाणून सोडणाऱ्या महाराष्ट्रातल्या नेत्यांचं जीवन पडद्यावरही झळकलं आहे. यातील काही नेत्यांवर आलेले बायोपिक चांगले लोकप्रियही झाले. यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, वसंतराव नाईक, सुशीलकुमार शिंदे, गोपीनाथ मुंडे या नेत्यांचं आयुष्य सिनेमातूनही लोकांसमोर आलं आहे.

यशंतराव चव्हाण – बखर एका वादळाची

संयुक्त महाराष्ट्राचा अमृत कलश ज्यांनी आणला ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं आयुष्य बरंच वादळी राहिलं. स्वातंत्र्य चळवळीपासून सामाजिक जीवनात आलेल्या यशवंतरावांनी राज्याबरोबरच केंद्रातही काम केलं. राज्यात काम करत असताना यशवंतरावांना पंतप्रधान पंडित नेहरू यांनी केंद्रात येण्याची सांगितलं. त्यानंतर यशवंतराव दिल्लीत गेले. तेव्हापासून हिमालयाच्या मदतील सह्याद्री धावला हा वाक्यप्रयोग प्रचलित झाला. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्यावर सिनेमा करण्यात आला. प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी या सिनेमाच दिग्दर्शन केलं होतं. सिनेमाचं नाव होतं ‘यशवंतराव चव्हाण- बखर एका वादळाची’. हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता.

वसंतराव नाईक – महानायक वसंत तू

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद ज्यांनी सर्वाधिक काळ भूषवलं ते म्हणजे वसंतराव नाईक. वसंतराव नायकांची राजकीय कारकीर्दही उल्लेखनीय राहिली. नाईक यांच्या आयुष्यावर ‘महानायक वसंत तू’ हा चित्रपट 2015 साली पडद्यावर झळकला. अभिनेता चिन्मय मांडलेकर याने वसंतरावांची भूमिका केली होती.

बाळासाहेब ठाकरे – ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या एका नावानं गारूड केलं ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. सत्तेच्या सारीपाटाबाहेर राहुन बाळासाहेब राजकारण चालवलं. बाळासाहेबांची रोखठोक भाषा. निडरपणे भूमिका मांडणे या गोष्टी मराठी मनाला भावल्या. त्यामुळेच त्यांच्याविषयी एक आकर्षण लोकांच्या मनात होतं. तर बाळासाहेबांचा जीवनपट शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पडद्यावर आणला. हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने बाळासाहेबांची भूमिका केली होती.

सुशीलकुमार शिंदे – दुसरी गोष्ट

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री मंत्री अशा बऱ्याच पदे सुशीलकुमार शिंदे यांनी भूषवली. त्यांचं पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यापासून सुरू झालेला सुशीलकुमार शिंदे यांचा प्रवास केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहोचला. त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘दुसरी गोष्ट’ हा चित्रपट आला होता. त्यात शिंदे यांची भूमिका सिद्धार्थ चांदेकर आणि मोहन गोखले यांनी केली होती. तर शरद पवारांची भूमिका आनंद इंगळे यांनी केली होती.

गोपीनाथ मुंडे – संघर्षयात्रा

मास लिडर अशी ओळख असलेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाला तळागाळात पोहोचवलं. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गोपीनाथ मुंडे यांचं आयुष्य झंझावाती राहिलं. त्यांच्या आयुष्याचा वेध घेणारा ‘संघर्षयात्रा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. २०१७ मध्ये आलेल्या या सिनेमात गोपीनाथ मुंडे यांची भूमिका शरद केळकर यांनी केली होती.