महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपला पाठिंबा दिला. या मुद्द्यावरून अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमने-सामने आले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष सरकार स्थापन करण्यास अंतिम टप्प्यात असतानाच राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्यावर भाजपाने सरकार स्थापनेचा दावा केला. त्याचबरोबर शनिवारी सकाळी राजभवनात शपथविधीही पार पडला. या प्रकरणानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. त्यानंतर अजित पवारा यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले, पण अजित पवार यांनी माघार घेण्यास नकार दिला.
“आता भाजपावाले धरणातील पाणी ओंजळीने पितील”
शुक्रवारी रात्रीपर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यामध्ये स्थापन होईल, असे चित्र दिसत असतानाच अचानक शनिवारी सकाळी राज्यात भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या प्रकारानंतर पवार कुटुंबात उभी फूट पडली असल्याच्या चर्चा रंगल्या, पण या दरम्यान अजित पवार यांनी एक महत्त्वाची भावना व्यक्त केली.
“अजित पवारांनी शरद पवार यांचं काम सोपं केलं”
पवार कुटुंबीयांमध्ये एकीकडे हा वाद सुरू असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि युवा नेते उमेश पाटील यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘मला अगदी उभं-आडवं जरी चिरलं, तरीही माझ्या शरीरात फक्त शरद पवार साहेबच आहेत. मी राष्ट्रवादीतच आहे. पवार कुटुंब एकत्र आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अजिबात संभ्रमात पडू नये’, अशा शब्दांत अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अजित पवार पुन्हा झाले ‘अॅक्टिव्ह’; म्हणाले ‘थँक यू’
या प्रकारानंतर रविवारी दुपारी अजित पवार पुन्हा Active झाले आणि त्यांनी भाजपच्या बड्या नेत्यांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छांसाठी त्या साऱ्यांना धन्यवाद दिले. त्यानंतर मी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहे. पवार साहेब हेच माझे नेते आहेत आणि भाजपा-राष्ट्रवादी राज्याला स्थिर सरकार देईल असे ट्विट अजित पवारांनी केले. मात्र अजित पवार यांचे हे वक्तव्य अत्यंत चुकीचे आणि लोकांची दिशाभूल करणारं आहे, असं म्हणत शरद पवार यांनी त्यांना फटकारले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 25, 2019 10:14 am