विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राला नवं सरकार कधी मिळणार इतकाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपापाठोपाठ युतीतला मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आलेला नाही. त्यामुळं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सरकार स्थापन करण्याचं आमंत्रण दिलं आहे. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रवादीला आज सायंकाळपर्यंत वेळ देण्यात आला असून, राष्ट्रवादीला आव्हान पेलवणार का? या प्रश्नाचं उत्तर दिवसअखेर दिसणार आहे.

Live Blog

17:20 (IST)12 Nov 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीची थोड्याच वेळात बैठक

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता स्थापन होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचे नेते मुंबईत दाखल झाले असून, थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे. यशवंतराव चव्हाण केंद्रात ही बैठक होत आहे. त्यानंतर दोन्ही काँग्रेस आपला निर्णय जाहीर करू शकतात.

16:30 (IST)12 Nov 2019
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट; लवकरच होणार घोषणा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली होती. त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी मिळाली असून, लवकरच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार आहे. गृह मंत्रालयानं साडेपाच वाजता पत्रकार परिषद बोलावली असून, त्यात याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला अवधी संपण्याआधीच राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वेळ वाढवून मागितला होता. ती मागणी फेटाळत राज्यपालांनी ही शिफारस केल्याचं राजभवनातून सांगण्यात येते. 

15:59 (IST)12 Nov 2019
राज्यपालांच्या निर्णयाला शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान

राज्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी वेळ वाढवून देण्यात यावा, ही शिवसेनेची मागणी राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी फेटाळून लावली होती. त्यानंतर शिवसेनेनं थेट सर्वोच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेची बाजू काँग्रेसचे नेते आणि प्रसिद्ध विधिज्ज्ञ कपिल सिब्बल हे मांडणार आहे. शिवसेनेने राज्यपालांकडे तीन दिवसाचा वेळ मागितला होता. 

15:18 (IST)12 Nov 2019
मोदींनी घेतला राज्यातील कायदा सुव्यस्थेचा आढावा

कोणताही पक्ष राज्यात सत्ता स्थापन करण्यास तयार झाला नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू शकते. राजकीय आणि प्रशासकीय घडमोडी त्याच दिशेने सुरू झाल्या आहेत. परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाची बोलावली होती. या बैठकीत महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

14:49 (IST)12 Nov 2019
राष्ट्रवादीकडे बहुमत नाही; काँग्रेससह शिवसेना सोबत आल्यानंतरच सरकार स्थापन होईल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांची बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, "सत्तास्थापनेसंदर्भात शरद पवार यांना सर्वाधिकार देण्यात आले असून, एक समितीही स्थापन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बहुमत नाही. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय राज्यात स्थिर सरकार स्थापन होऊ शकत नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे. दिल्लीतून काँग्रेसचे नेते आले आहेत. ते शरद पवार यांच्याशी  चर्चा करणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल," असं मलिक म्हणाले.

14:22 (IST)12 Nov 2019
शिवसेना ठोठावणार न्यायालयाचे दरवाजे

राज्यातील सत्ता स्थापनेसाठी बहुमताच्या आकड्यांची जुळवाजुळव सुरू असताना दुसरीकडं राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. केंद्रीयमंत्री मंडळाची बैठक सुरू असून, त्यात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यात आल्याचे वृत्त आहे. जर राष्ट्रपती राजवट लागल्यास शिवसेना सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रपती राजवटीला आव्हान दिल्यानंतर बाजू मांडण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांच्याशी संपर्क सुरू केला आहे.

14:07 (IST)12 Nov 2019
महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या आशा धुसर; राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत अद्याप एकमत नाहीच

राज्यातील सत्तेचा सुटण्याची शक्यता धुसर होत चालली आहे. भाजपा, शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसकडून बहुमताच्या आकड्यांची जुळवाजुळव सुरू असली तरी, त्यात यश येताना दिसत नाही. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे. आम्ही काँग्रेसच्या निर्णयाची वाट बघत आहोत, असं वारंवार राष्ट्रवादीकडून सांगितलं जात आहे. पण, तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन करण्यासंदर्भात काँग्रेसचा ठाम निर्णय होत नसून, तळ्यात मळ्यात अशीच अवस्था दिसून येत आहे. 

13:18 (IST)12 Nov 2019
राज्यपालांनी कमी वेळ दिल्याची खंत -उद्धव ठाकरे

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी संजय राऊत यांची महत्त्वाची भूमिका असून, त्यामुळे या भेटीकडे राजकीय अंगानेही बघितलं जात आहे. दरम्यान, संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "सत्तेचा दावा करण्यासाठी  राज्यपालांकडून कमी वेळ मिळाला याची खंत आहे. पण, अविश्वसनीय असं करून दाखवणार," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

12:04 (IST)12 Nov 2019
नव्या आघाडीतील 'दुवा' लिलावतीतूनही सक्रिय; उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या भेटीला

लिलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले शिवसेनेचे संजय राऊत यांच्या भेटीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे भेटीला येण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे संजय राऊत यांची भेट घेऊन गेले आहेत. भाजपाला दूर केल्यानंतर संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका आक्रमकपणे मांडणाऱ्या राऊत यांनी बहुमतासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या नव्या आघाडीतील संजय राऊत महत्वाचा दुवा असून, रुग्णालयात असतानाही ते सध्या सक्रिय असल्याचे दिसत आहे. 

11:48 (IST)12 Nov 2019
संजय राऊत यांना उद्या सुटी मिळणार

शिवसेनेला सत्ता स्थापनेच आमंत्रण मिळाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सोमवारी सुरू होते. या सर्व घडामोडींमध्ये संजय राऊत आघाडीवर होते. मात्र, दुपारी अचानक छातीत वेदना होत असल्याने आज शिवसेना खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. सोमवारी रात्री राऊत यांच्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळून आले आहेत. दरम्यान, राऊत यांना अतिदक्षता विभागातून सामान्य विभागात हलवण्यात आले असून, त्यांना उद्या सुटी मिळण्याची शक्यता आहे. सध्या राऊत यांचा लिखाण करतानाचा रुग्णालयातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

10:55 (IST)12 Nov 2019
काँग्रेस कोअर कमिटीची दिल्लीतील बैठक रद्द

राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. भाजपा, शिवसेनेनंतर राष्ट्रवादीला राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं आहे. यासंंदर्भात निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस आहे. दरम्यान, काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक दिल्लीत होणार होती. मात्र, ही बैठक रद्द करण्यात आली असून, महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते पुन्हा मुंबईकडे रवाना झाले आहेत. दुपारी चार वाजता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे.

10:20 (IST)12 Nov 2019
राष्ट्रवादीच्या आमदारांना शरद पवार भेटणार

सोमवारी शिवसेनेला बहुमत नसल्यामुळं दावा करता आला नाही. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं राज्यपालांकडून आमंत्रण मिळालं आहे. आता राष्ट्रवादी सरकार स्थापनेचा दावा करणार का? याविषयी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाच्या आमदारांची ११ वाजता भेट घेणार आहे.  दरम्यान, आमदारांची बैठकीला जाण्यापूर्वी शरद पवार हे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी लिलावती रुग्णालयात गेले आहेत.

10:11 (IST)12 Nov 2019
काँग्रेस सोबत आली तरच मार्ग निघू शकतो -अजित पवार

राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळं कोणताही निर्णय फक्त राष्ट्रवादीनं एकट्यानं निर्णय घेऊन काहीही होणार नाही. काँग्रेसला निर्णय घ्यावा लागेल. काँग्रेससोबत आली तरच यातून मार्ग निघू शकतो. त्यासाठी आमची बैठक होणार आहे. त्यानंतर निर्णय घेऊ. स्थिर सरकार देण्यासाठी तीन पक्ष एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा करण्यात अडथळे येत होते. त्यांचे आमदार जयपूरला असल्यानं व्यवस्थित चर्चा होत नव्हती. त्यामुळं आज बैठक होणार आहे, राष्ट्रवादीचे विधानसभेतील गटनेते अजित पवार यांनी सांगितलं.

08:52 (IST)12 Nov 2019
राज्यातील राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांची ४ वाजता बैठक

राज्यपालांनी राष्ट्रवादीला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिल्यानंतर सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. दुपारी ४ वाजता ही बैठक होणार असून, त्यात सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. त्यामुळं शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की, शिवसेनेचा पाठिंबा घ्यायचा यासंदर्भात बैठकीत चर्चा होऊ शकते.

08:45 (IST)12 Nov 2019
काँग्रेसच्या निर्णयामुळं शरद पवार नाराज

सोमवारी शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात राष्ट्रवादीनं अनुकूल भूमिका घेतली होती. मात्र, काँग्रेसनं ऐनवेळी नकारात्मक भूमिका घेतल्यानं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याचं चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेला पाठिंबा द्यावा अशी अस मत काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचं आणि आमदाराचं आहे. मात्र, पक्षश्रेष्ठीनं ऐनवेळी पाठिंब्याचं पत्रच न पाठवल्यानं शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही.

08:12 (IST)12 Nov 2019
काँग्रेसची दिल्लीत दहा वाजता बैठक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याचं आमंत्रण पाठवल्यानंतर पुन्हा राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. दिल्लीत दहा वाजता होणाऱ्या या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि सत्ता स्थापनेवर चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर काँग्रेसचे अहमद पटेल, मल्लिकार्जून खर्गे आणि सी वेणुगोपाल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे.