महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर राज्यातील सत्तेचं चित्र बदललं. न्यायालयानं उद्या म्हणजेच 27 नोव्हेंबरला पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिलेले असताना त्याआधीच देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कोसळलं. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची मनधरणी करण्यात पक्षाच्या नेत्यांना यश आलं. अजित पवारांनी दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बहुमत नसल्याचं सांगत आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला.

Live Blog

19:45 (IST)26 Nov 2019
आघाडी पाच नाही पुढची पंधरा वर्ष टिकू शकते

किमान समान कार्यक्रमावर ठरवल्यानुसार काम केलं तर ही महाविकास आघाडी पाच नाही पुढची पंधरा वर्ष टिकेल - जयंत पाटील

19:34 (IST)26 Nov 2019
शेतकरी, मजूर, अपंग, वंचित सर्वांपर्यंत महाविकास आघाडी पोहोचेल

शेतकरी, मजूर, अपंग, वंचित सर्वांपर्यंत महाविकास आघाडी पोहोचेल. महाआघाडी सगळया गोष्टींना भेद करणारी राहील - बच्चू कडू

19:30 (IST)26 Nov 2019
रयतेचे राज्य निर्माण करु

छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून महाविकास आघाडी काम करेल. रयतेचे राज्य निर्माण करु. सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करु. ही आघाडी अबाधित राहील अशी अपेक्षा आहे - नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते

19:16 (IST)26 Nov 2019
शिवतीर्थावर १ डिसेंबरला शपथविधी

१ डिसेंबरला शिवतीर्थावर होणार उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी 

19:15 (IST)26 Nov 2019
ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचले शरद पवार

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचले आहेत.

18:47 (IST)26 Nov 2019
आदित्य ठाकरे ट्रायडंट हॉटेलमध्ये दाखल

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहचले आहेत तसंच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हेदेखील याच हॉटेलच्या वाटेवर आहेत. 

18:41 (IST)26 Nov 2019
एकच वादा अजितदादाच्या घोषणा

अजित पवार यांच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. एकच वादा अजितदादा अशा घोषणा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी दिल्या.  

18:38 (IST)26 Nov 2019
गर्व झालेल्या भाजपाचे घर अखेर खाली

गर्व झालेल्या भाजपाचे घर अखेर खाली आले आहे अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. 

18:36 (IST)26 Nov 2019
ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक

ट्रायडंट या हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.  या बैठकीसाठी अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ट्रायडंटमध्ये शरद पवार दाखल झाले आहेत. तर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेही उपस्थित होणार आहेत 

16:53 (IST)26 Nov 2019
फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

अजित पवारांचा राजीनामा आल्याने आमच्याकडेही बहुमत उरलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आमच्यासोबत आल्याने आम्ही सत्ता स्थापन केली होती. आता अजित पवारच आमच्यासोबत नाहीत त्यामुळे आमच्याकडे बहुमत नाही. आम्ही आमदार फोडणार नाही. ही पत्रकार परिषद झाल्यावर मी राज्यपालांना भेटून राजीनामा देणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. त्यानंतर राजभवनात जाऊन फडणवीस यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला.

16:12 (IST)26 Nov 2019
राजीनामा देण्यासाठी फडणवीस राजभवनात दाखल

भाजपाकडं बहुमत नसून, आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषद संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करण्यासाठी राजभवनात दाखल झाले आहेत.

15:44 (IST)26 Nov 2019
आमच्याकडं बहुमत नाही, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार -देवेंद्र फडणवीस

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा आपल्याकडं सुपूर्द केला असून, आमच्याकडं बहुमत चाचणीला सामोर जाण्यासाठी संख्याबळ नाही. आम्हाला कोणताही घोडेबाजार करायचा नाही. त्यामुळे पत्रकार परिषद झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा देणार आहे," अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

15:40 (IST)26 Nov 2019
भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच चर्चा

"तीन पक्ष सत्तास्थापन करण्यासाठी समान कार्यक्रम तयार करत होते. पण, मुळात भाजपाला सत्तेपासून दूर कसं ठेवायचं हेच ते ठरवत होते," असं फडणवीस म्हणाले.

15:38 (IST)26 Nov 2019
शिवसेना राष्ट्रवादी-काँग्रेसशी बोलत होती, पण आमच्याशी नाही -फडणवीस

विधानसभा निवडणुकी महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला संपूर्ण बहुमत दिलं. तर भाजपाला सर्वात मोठा पक्ष म्हणून 105 जागा दिल्या. हा जनादेश भाजपालाच होता. कारण शिवसेनेपेक्षा भाजपाला जास्त जागा मिळाल्या. त्यामुळं आम्ही चांगलं सरकार देण्याचा प्रयत्न केला. पण, नंबर गेममुळं शिवसेनेनं जी गोष्ट कधीही ठरली नव्हती. ती शिवसेनेनं मागितली. मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देणार नाही, असं आम्ही स्पष्ट केलं होतं. याच मुद्यावरून शिवसेनेनं भूमिका घेतली. आम्ही त्यांची वाट बघत होतो. पण, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसशी चर्चा सुरु केली, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

15:11 (IST)26 Nov 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राजीनामा देणार?

अजित पवार यांनी अचानक उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बहुमत चाचणीला काही तासांचा अवधी बाकी असतानाच पवारांनी निर्णय घेतला. त्यामुळं बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान भाजपासमोर उभं राहिलं आहे. बहुमताचा आकडा अनिश्चित झाल्यानं मुख्यमंत्री फडणवीस राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद बोलावली असून, यात मुख्यमंत्री काय बोलतात याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

14:35 (IST)26 Nov 2019
बहुमत चाचणीआधीच महाराष्ट्रात राजकीय भूंकप

"घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणं गरजेचे आहे," असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं "कोणताही विलंब न करता 27 नोव्हेंबरला पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी पूर्ण करून बहुमत चाचणी घेण्यात यावी. बहुमत चाचणीसाठी हंगामी व स्थायी अध्यक्षांची नेमणूक करून बहुमत चाचणी गुप्त मतदान पद्धतीनं न करता त्यांचं थेट प्रक्षेपण करण्यात यावं," असे आदेश दिले. त्यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाच्या बैठका सुरू असतानाच राजकीय भूंकप झाला आहे. बहुमत चाचणी होण्याआधीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा पाठिंबा मागे घेत असल्याचा अप्रत्यक्ष संदेश अजित पवार यांनी दिला असून, हा भाजपालाही मोठा धक्का समजला जात आहे. त्यामुळं आता देवेंद्र फडणवीसही राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

14:26 (IST)26 Nov 2019
अजित पवारांनी दिला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तीन दिवसांतच राजीनामा दिला आहे. 

14:00 (IST)26 Nov 2019
महाविकास आघाडीच्या आमदारांची पाच वाजता बैठक

भाजपानं सरकार स्थापन केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं 27 नोव्हेंबर अर्थात उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं सर्वच पक्षांनी आपल्याला आमदारांची बैठक बोलावली आहे. भाजपानं आज (26 नोव्हेंबर) संध्याकाळी गरवारे क्लबला भाजपाच्या सर्व आमदारांना बोलावलेलं आहे. दुसरीकडं शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांचीही बैठक होणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्याची निवड होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

13:50 (IST)26 Nov 2019
शिवसेना-राष्ट्रवादीची बैठक सुरू

सर्वोच्च न्यायालयानं बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपात वेगवान घडामोडी सुरू आहेत. भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक सकाळी पार पडली असून, आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक हॉटेल ग्रँड हयात येथे सुरू आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, छगन भुजबळ आणि संजय राऊत उपस्थित आहे.

13:23 (IST)26 Nov 2019
कुठलाही घोडेबाजार होणार नाही-अशोक चव्हाण

बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड झाली आहे. उद्या फ्लोअर टेस्ट आम्हीच जिंकू असा दावा अशोक चव्हाण यांनी केला. तसंच कोणताही घोडेबाजार होणार नाही असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. 

12:22 (IST)26 Nov 2019
विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू; दानवेंचा दावा

भाजपा कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू. आज (26 नोव्हेंबर) संध्याकाळी गरवारे क्लबला भाजपाच्या सर्व आमदारांना बोलावलेलं आहे," अशी माहिती दानवे यांनी दिली.
---

12:07 (IST)26 Nov 2019
भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीला अजित पवार हजर

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी सुर झाल्या आहेत. बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी होत असलेल्या बैठकीला फडणवीस यांच्यासह भाजपाचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. विशेष म्हणजे या बैठकीला अजित पवार हे उपस्थित आहेत.

11:46 (IST)26 Nov 2019
शरद पवारांनी मानले सर्वोच्च न्यायालयाचे आभार

राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. या निकालाचं दोन्ही राजकीय बाजूंकडून स्वागत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निकालावर त्यांची भूमिका मांडली आहे. "राज्यघटनेतील तत्वे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक केल्याबद्दल सन्मानीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार! हा निकाल योगायोगानं संविधान दिवस साजरा होत असताना आल्यानं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झाला, याचा आनंद आहे," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

11:41 (IST)26 Nov 2019
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; शिवसेनेची मागणी

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं स्वागत करत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. महाविकास आघाडीकडं 170 आमदारांचं संख्याबळ आहे. सभागृहात आम्ही बहुमत सिद्ध करू, असं शिंदे म्हणाले.

11:29 (IST)26 Nov 2019
बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही तयार -चंद्रकांत पाटील

भाजपानंही न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, "न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. न्यायालयानं उद्या (27 नोव्हेंबर) पाच वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपा तयार आहे," असं पाटील यांनी सांगितलं.

11:23 (IST)26 Nov 2019
सत्याचा विजय झाला आहे -संजय राऊत

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "या देशात न्याय व्यवस्था सर्वोच्च आहे. न्यायालयात आम्ही जे बोलत होतो, ते सत्य होतं. न्यायालयाच्या निकालानं ते खरं ठरलं आहे. सत्याचा विजय झाला आहे," असं संजय राऊत म्हणाले.

11:10 (IST)26 Nov 2019
तिन्ही पक्षांकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

राज्यात भाजपानं सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणात न्यायालयानं महत्वाचा निकाल दिला आहे. न्यायालयानं 27 नोव्हेंबरला पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. या निकालानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील नेत्यांनी निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे.

10:41 (IST)26 Nov 2019
गुप्त मतदानाला नकार, थेट प्रक्षेपण करण्याचे न्यायालयाचे आदेश

राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचावर सर्वोच्च न्यायालयानं महत्वाचा निकाल दिला आहे. "लोकशाही मूल्यांचं संरक्षण होणं आवश्यक आहे. लोकांना चांगलं सरकार मिळणं हा मुलभूत अधिकार असून, न्यायालयाला यासंदर्भात काही आदेश देणं गरजेचे आहे," असं मत न्यायमूर्ती एन.व्ही रामन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठानं नोंदवलं. "घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणं गरजेचे आहे. त्यामुळं कोणताही विलंब न करता 27 नोव्हेंबरला पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी पूर्ण करून बहुमत चाचणी घेण्यात यावी. बहुमत चाचणीसाठी हंगामी व स्थायी अध्यक्षांची नेमणूक करून बहुमत चाचणी गुप्त मतदान पद्धतीनं न करता त्यांचं थेट प्रक्षेपण करण्यात यावं," असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. न्यायायलयाच्या आदेशानंतर भाजपासमोर उद्याच बहुमत सिद्ध करण्याच आव्हान असणार आहे.

10:33 (IST)26 Nov 2019
थोड्याच वेळात न्यायालयात सुनावणी सुरू होणार

राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्याचा निर्णय बेकायदा असल्याचा मुद्दा उपस्थित करत या निर्णयाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका केलेली आहे. त्यावर थोड्याच वेळात न्या. एन. व्ही. रमण, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना यांच्या तीन सदस्यीय खंठपीठासमोर सुनावणी होत आहेत. न्यायमूर्ती दाखल झाले असून दोन्ही पक्षाकारांचे वकील न्यायालयात हजर झाले आहेत.

10:20 (IST)26 Nov 2019
राज्यपालांच्या साक्षीने संविधानाची हत्या -संजय राऊत

“संविधानात ज्याच्याकडे बहुमताचा आकडा आहे त्याला पंतप्रधान, मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जाते. पण अजित पवारांनी दाखवलेल्या खोट्या पत्रावर विश्वास ठेवून शपथ देण्यात आली. राज्यपालांच्या साक्षीने संविधानाची हत्या करण्यात आली,” असं म्हणत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.

10:15 (IST)26 Nov 2019
"गटनेता कोण? अंतिम निर्णय विधासभा अध्यक्षच घेणार"

विधिमंडळ सचिवालयाकडे जयंत पाटील हे आमचे गटनेते असल्याचे राष्ट्रवादीचे पत्र मिळाले आहे. पण, गटनेते कोण याचा निर्णय विधानसभा अध्यक्षच घेतील, आजच्या स्थिती राष्ट्रवादीचे गटनेते कोण यांचा अंतिम निर्णय झालेला नाही, अशी माहिती विधिमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी सांगितलं.

09:29 (IST)26 Nov 2019
अजित पवाराच राष्ट्रवादीचे गटनेते; भाजपा मतावर ठाम

राष्ट्रवादीचा गटनेता कोण याविषयी बरेच वादंग सुरू आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे गटनेते असल्याची माहिती विधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली. त्यानंतर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून राज्यपालांकडे अजित पवार यांच्या नावाची नोंदणी आहे. आता निर्णय विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे घेतील, असं शेलार म्हणाले.

09:17 (IST)26 Nov 2019
बहुमत सिद्ध करण्याच्या कालावधीसंदर्भात निकाल येण्याची शक्यता

राज्यातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालय मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता निकाल देणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी किती कालावधी द्यायचा याबाबत न्यायालय आदेश देईल. सोमवारी न्या. एन. व्ही. रमण, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना यांच्या तीन सदस्यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला, पण निकाल राखून ठेवला. सर्वोच्च न्यायालयात रविवारी झालेल्या विशेष सुनावणीत न्यायालयाने महाधिवक्ता तुषार मेहता यांना तीन दस्तऐवज सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार, राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना शपथविधीसाठी दिलेल्या आमंत्रणाचे पत्र, राज्यपालांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले १७० सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र न्यायालयात सादर करण्यात आले.

09:15 (IST)26 Nov 2019
राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटीलच

राज्यातील सत्तास्थापनेचा गुंता वाढत चालला आहे. अजित पवार हेच राष्ट्रवादीचे गटनेते असल्याचं म्हणणाऱ्या भाजपासाठी धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळाच्या सचिवालयामध्ये जयंत पाटील यांचीच नोंद आहे. विधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळे गटनेते जयंत पाटील यांनी काढलेला व्हीपच राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी बंधनकारक असणार आहे.