11 July 2020

News Flash

महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुन्हा ‘सिल्व्हर ओक’

भाजपा 'वेट अ‍ॅण्ड वॉच'च्या भूमिकेत

“शरद पवार यांचं राजकीय युग संपल आहे. पिढी बदलली आहे. पवारांनी केलेलं राजकारण आता जनता स्वीकारत नाही.” हे विधान आहे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. विधानसभा निवडणुकीपूर्वी इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं होतं. पण, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा शरद पवारांच्या भोवतीच महाराष्ट्राच्या राजकारणानं फेर धरला. सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडी आणि प्रत्येकाची ‘सिल्व्हर ओक’कडे (शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान) वळणारी पावलं यातून महाराष्ट्राच्या राजकारणातून पवारांना वगळता येत नाही, याचाच प्रत्यय येत आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांची अवस्था बिकट झाली. त्यानंतर राष्ट्रवादीला लागलेली गळती पक्षाला गलितगात्र करणारी होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह भाजपा नेत्यांच्या तोंडी निकाल लागेपर्यंत सातत्यानं शरद पवारांचं नाव होतं. एका अर्थानं पवार हे आता संपलेले आहे, असा एक सूर भाजपाच्या गोटातून लावला जात होता. तो बिंबवण्याचा प्रयत्नही झाला. पण, राज्यात आपल्याला कुणी विरोधक दिसत नाही. आमचे पैलवान तेल लावून आहेत. पण समोर पैलवानच नाही, असं म्हणणारी भाजपा निवडणूक निकालानंतर राज्यात निर्माण झालेल्या सत्तेच्या पेचप्रसंगातून गायब झाल्यासारखीच झाली आहे. चर्चेत आहेत ते शरद पवार.

निवडणुकीच्या प्रचारात पक्षाला आलेली मरगळ झटकण्याची जबाबदारी पवारांनी स्वतःच्या डोक्यावर घेतली. पक्षाची तूटत चालली नाळ आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी डागाळलेली प्रतिमा दूर करत पुन्हा पक्षाला नवसंजीवनी दिली. निवडणुकीचे निकाल घोषित झाले. शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाची मागणी करत भाजपाची कोंडी केली. त्यातून भाजपा सत्तेच्या केंद्रातून बाहेर गेली. पण, सुरूवातीपासूनच राज्यात काय होणार? कुणाची सत्ता निर्माण होणार? या प्रश्नांच्या उत्तरांसाठी सगळ्यांचच लक्ष शरद पवारांकडे लागलेलं आहे. हळूहळू हे चित्र अधिक स्पष्ट होत गेलं. राजकीय नेत्यांच्या पवारांच्या सिल्व्हर ओकवरील बैठक वाढल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चाव्या पुन्हा एकदा पवारांच्या हाती आल्या आहेत.

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेनं ‘एनडीए’तून बाहेर पडत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सोबत पाऊल टाकलं आहे. काँग्रेसही शिवसेनेसोबत जाण्यास तयार झाली. पण, शिवसेना-काँग्रेस एक पाऊल पुढं आली त्यामागेही शरद पवारच आहेत. दोन्ही वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांमध्ये सुवर्णमध्ये काढण्यात शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या भूमिकेमुळेच अशक्य वाटणारे सत्तासमीकरण महाराष्ट्रात उदयाला येत असून, सर्वात जास्त जागा मिळूनही भाजपा ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत गेला आहे. प्रचारातील टीकेचा भाग सोडला आणि कुणी कितीही हेटाळणी केली तरी आपल्याशिवाय राज्यातील राजकारणाचं पानही हलू शकत नाही, हेच पवारांनी निवडणुकीतून सिद्ध केलं आहे. त्यामुळे ‘सिल्व्हर ओक’ महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 11:02 am

Web Title: maharashtra government formation sharad pawar again proved about his role in maharashtra political scenario bmh 90
Next Stories
1 राष्ट्रपती राजवटीवर रितेश देशमुखनं मांडलं मराठी माणसाचं मत, म्हणाला…
2 शिवसेनेच्या याचिकेवर तातडीची सुनावणी नाही
3 फॉर्म्युला : मुख्यमंत्रीपद सेना-राष्ट्रवादीकडे; उपमुख्यमंत्री काँग्रेसचा!
Just Now!
X