२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला सत्ता मिळवून देण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या दिग्गज रणनीतीकारामुळेच महाराष्ट्रात भाजपा सत्तास्थापनेपासून दूर राहिल्याचा आरोप होत आहे. महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेवरुन भाजपा आणि शिवसेनेमध्ये संबंध कमालीचे ताणले गेले असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपामध्ये सुरू असलेल्या महाभारतासाठी भाजपाकडून निवडणूक रणनीतीकार आणि जदयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीसाठी भाजपाच्या सोशल मीडियाच्या राष्ट्रीय प्रभारी प्रिती गांधी यांनी प्रशांत किशोर यांना जबाबदार ठरवलंय.
“प्रशांत किशोर यांनी डुबवलं”, असं ट्विट प्रिती गांधी यांनी केलं आहे. तर, जदयूचे बंडखोर नेते अजय आलोक यांनीही प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा साधलाय. त्यांनी किशोर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करताना ‘मास्टर स्ट्रॅटेजिस्ट’मुळे महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झालीये असं म्हटलं आहे. “काही दिवसांपासून शिवसेना एका रणनीतीकाराकडून ज्ञान घेत होती. परिणाम सगळ्यांसमोर आहे..”अशा आशयाचं ट्विट अलोक यांनी केलं आहे.
प्रशांत किशोर ले डूबा!#MaharashtraPolitics
— Priti Gandhi (@MrsGandhi) November 11, 2019
एक हैं मास्टर स्ट्रैटेजिस्ट पिछले कुछ दिनो से शिव सेना उनसे ज्ञान ले रही थी नतीजा सब देख रहे हैं -अब महामहिम ने और समय नहीं दिया लगता हैं इस पहलू पे मास्टर साहब ने ध्यान नहीं दिया होगा !!! नतीजा ना तीन में ना तेरह में ! कहते हैं ना गफ़लत में सब गए , माया मिली ना राम ।जय मातर साब
— Dr Ajay Alok (@alok_ajay) November 11, 2019
निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. प्रशांत किशोर यांनीच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न दाखवलं, त्यामुळेच ५०-५० फॉर्म्युल्यांतर्गत सेनेकडून अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी केली अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसारच सेनेने भाजपाशी फारकत घेतल्याचंही बोललं जात आहे. यावरुन सोशल मीडियामध्ये प्रशांत किशोर चर्चेत आहेत.
First Published on November 13, 2019 11:41 am