शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष सरकार स्थापन करण्यास अंतिम टप्प्यात असतानाच राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्यावर भाजपाने सरकार स्थापनेचा दावा केला. त्याचबरोबर शनिवारी सकाळी राजभवनात शपथविधीही पार पडला. या प्रकरणानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. शुक्रवारी रात्रीपर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यामध्ये स्थापन होईल, असे चित्र दिसत असतानाच अचानक शनिवारी सकाळी राज्यात भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शनिवारी त्यांनी कोणीतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मात्र आता अजित पवार पुन्हा ‘अ‍ॅक्टिव्ह’ झाले असून त्यांनी साऱ्यांच्या अभिनंदनाचे ट्विट स्वीकारले असून त्यांनी भाजपा नेत्यांना धन्यवाद दिले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी अजित पवार यांचे अभिनंदन केले होते. त्यावर रविवारी दुपारी अजित पवार यांनी धन्यवाद दिले. तसेच स्थिर सरकार देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी ट्विट करत मोदी यांना विश्वास दिला.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, राजनाथ सिंग यांनाही अजित पवार यांनी धन्यवाद म्हटले.

अजित पवार यांनी भाजपाचे नेते जे.पी. नड्डा यांच्या ट्विटला रिप्लाय दिला. त्यावर ते म्हणतात, जे.पी. नड्डाजी तुमच्या शुभेच्छा आणि विश्वासासाठी धन्यवाद.

केंद्रीय मंत्री पीयूष गोएल यांच्या ट्विटला उत्तर देताना अजित पवार यांनी टि्वट केले की, तुम्ही जो भरोसा ठेवला त्याबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे.

याशिवाय, त्यांनी केंद्रिय मंत्री सदानंद गौडा, मुख्तार अब्बास नकवी, सुरेश प्रभू, धर्मेंद्र प्रधान, गजेंद्र सिंग शेखावत, पुण्याचे खासदार गिरीश बापट, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, मनसुख मांडविया, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खा. अनुराग ठाकूर या साऱ्यांचेदेखील अजित पवार यांनी आभार मानले.

दरम्यान, या साऱ्या प्रकारानंतर अजित पवार यांची मनधरणी करण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न विफल ठरल्याची चर्चा आहे.