महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेणे गरजेचे असल्याचे सांगत न्यायलयाने उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी पूर्ण करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच या मतदानाचे थेट प्रक्षेपण करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

न्यायालयाच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपावाले हे गोबेल्सची पोरं आहेत, अशी खरमरीत प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि आमच्याकडे बहुमत असून आम्ही बहुमत चाचणी नक्कीच जिंकू असा विश्वास व्यक्त केला. या संबंधी एका प्रसारमाध्यमाला मुलाखत देताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला. की भाजपाकडून बहुमत सिद्ध केले जाईल असे सांगितले जात आहे. त्यावर बोलताना त्यांनी भाजपाच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.

याशिवाय, राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेत्याबाबतही त्यांनी भाष्य केले. जयंत पाटील हेच आमचे गटनेते आहेत. न्याय आणि कायदा हेच सांगतो की विधिमंडळ सचिवांकडे दिलेले पत्र हेच महत्त्वाचे असते. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचेच सरकार येणार, असे ते म्हणाले.

अजित पवार यांची मनधरणी करण्याचे काम सुरू आहे की नाही याबाबत माझ्याकडे सध्या तरी काहीही माहिती नाही. मी आणि आम्ही सारे जण शरद पवार यांना मानतो. ते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

दरम्यान, बहुमतासाठी घेण्यात येणारे मतदान हे गुप्त पद्धतीने न घेता ते थेट घेण्यात यावे तसेच या मतदानाचे लाइव्ह टेलिकास्ट करण्यात यावे असंही न्यायलयाने स्पष्ट केलं आहे. संबंधित निकाल देताना न्यायलयाने बहुमत चाचणीसाठी हंगामी व स्थायी अध्यक्षांची नेमणूक करून आमदारांना शपथ देण्याचे आदेश दिले आहेत.